Thu, Jul 02, 2020 11:12होमपेज › Kolhapur › तोट्याचा ‘टॉप गिअर’

तोट्याचा ‘टॉप गिअर’

Published On: Jul 06 2019 1:34AM | Last Updated: Jul 06 2019 12:03AM
कोल्हापूर : संतोष पाटील 

यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था आर्थिक संकटातून प्रवास करीत असल्याचे स्पष्ट होते. दुचाकीच्या वाढत्या वापराने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका बसत आहे.

तोट्यातील मार्ग बंद करणे, गाड्यांची संख्या कमी-अधिक करणे, निवृत्तीनंतर नवी भरती न करता ठोक मानधनावर कर्मचारी नेमणे, इतर उत्पन्‍नातून तोटा भरून काढणे, अशाप्रकाराने आस्थापना खर्च कमी करून तोटा कमी केला जात आहे. याचपद्धतीने केएमटीने 2017 मध्ये चार कोटी 18 लाखांचा तोटा तीन कोटी 22 लाखांवर आणला. तरीही प्रतिदिन दोन लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. 
एस.टी. महामंडळ (शहर वाहतूक), बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन बेस्ट, पीएमपीएल, नवी मुंबई मनपा परिवहन, नागपूर मनपा परिवहन, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, अमरावती, अहमदनगर, अकोला, लातूर, खोपोली नगरपरिषद परिवहन आदी 15 शहरांत सार्वजनिक प्रवासी रस्ते वाहतूक व्यवस्थेंतर्गत सेवा दिली जाते. बसेस संख्या वाढविल्याने काही शहरांतील सार्वजनिक वाहतूक फायद्यात दिसत असली, तरी केलेल्या खर्चाच्या मानाने हा नफा अत्यंत कमी असल्याचे आकडेवारी सांगते. नवी मुंबईत 309 वरून 422 बसेस संख्या झाली. फक्‍त सहा हजार प्रवासी वाढले. तरीही दीड कोटीचा तोटा झाला.

एस.टी.ने शहरांतर्गत सेवेसाठी मागील वर्षी 467 असलेली बसेसची संख्या कमी करून ती 382 वर आणली. रोज 17 हजार किलोमीटरचा प्रवास कमी केला. त्यातून 8 कोटी रुपयांचा नफा मिळविला. 28 लाख 34 हजारांवरून 26 लाख 20 हजार प्रवासी संख्या झाल्याने  बेस्टने बसेसची संख्या कमी करून ती 3267 वरुन 3058 प्रर्यंत आणली. तरीही 5 लाख रुपयांचा तोटा होत आहे. पुण्याच्या पीएमपीएलने 1382 बसेस मध्ये 43 ची भर घातली.  10 लाख  80 हजार वरुन 11 लाख 21 हजार प्रवासी संख्या केली. इतका व्याप करुन मागील वर्षी 21 कोटी 42 हजार असणारे उत्पन्न 20 कोटी चार लाख 62 हजारांवर गेले. 95 लाख रुपयांचा तोटा झाला.

केएमटीचा विचार करता, एका वर्षभरात रोज एक हजार किलोमिटर तोट्याची वाहतुक बंद केली. यातून मागील वर्षी 66 हजार असणारे प्रवासी 70 हजारांवर गेले. अहवालात 96 लाख रुपयांची केएमटीची उत्पन्न भरारी दिसत असली, तरी यात आस्थापणावरील खर्चात कपात हे प्रमुख कारण आहे.सरासरी 30 हजार रुपये पगार असणारे अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्याजागा रिक्‍त आहेत. या कर्मचार्‍यांच्या वाचलेल्या वेतनामुळे ही  उत्पन्नवाढ दिसत आहे. एकुणच राज्यातील सार्वजानिक वाहतुक व्यवस्था आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असल्याचे अहवालातून दिसते. तोडगा शक्य..!
व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे एका मार्गावर एकच बस सोडून डिझेल बचत करणे, एका मार्गावरील अनेक बसेस त्याचवेळी थांबविणे, आर्थिक ऊर्जितावस्था आणण्यासाठी पार्किंग ठेक्यासह इतर उत्पन्‍नाची जोड देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यातून इंधन बचतीसह पार्किंगच्या मोठ्या समस्येतून तोडगा निघेल.