Thu, Jul 09, 2020 22:21होमपेज › Kolhapur › खासगी प्रॅक्टिस : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या शिक्षकांवर गंडांतर?

खासगी प्रॅक्टिस : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या शिक्षकांवर गंडांतर?

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 12:45AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवेत असताना खासगी प्रॅक्टिस करणार्‍या शिक्षकांच्या (डॉक्टर्स) सेवेवर गंडांतर आले आहे. सेवेत असूनही खासगी प्रॅक्टिस करणार्‍या यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन शिक्षकांची वैद्यकीय व्यवसायाची नोंदणी रद्द (डी रजिस्ट्रेशन) करावी, अशा आशयाचे पत्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे पाठविले आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात दोन्ही दरडीवर पाय ठेवून संपत्तीचे इमले बांधणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयांच्या शिक्षकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. राज्य शासनाचा हा निर्णय सर्व शासकीय महाविद्यालयांना लागू झाला, तर राज्यातील अनेक शिक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

यवतमाळ येथील अलीकडेच कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने हे कडक पाऊल उचलले आहे. या घटनेवेळी शेकडो बाधित शेतकरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात दाखल झाले असताना या वैद्यकीय महाविद्यालयातील तीन प्रमुख शिक्षक सेवेत अनुपस्थित होते आणि त्यांनी शासकीय सेवेपेक्षा खासगी प्रॅक्टिसला प्राधान्य दिले होते. यासंबंधी तक्रार करण्यात आल्यानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकार्‍यांना 26 ऑक्टोबर रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने हे धाडसी पाऊल उचलले असून, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले. राज्य शासनाची एकूण 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयांत कायम सेवेत असलेल्या शिक्षकांनी खासगी व्यवसायाकडे लक्ष न देता वैद्यकीय महाविद्यालयांत आपली अधिकाधिक सेवा खर्ची करून वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचवावा, यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनेही वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांनी खासगी व्यवसाय न करता अधिकाधिक सेवा महाविद्यालयांत बजावावी, यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. तरीही बहुतांश शिक्षकांना व्यवसायाचा मोह सुटत नव्हता. आता यवतमाळच्या धर्तीवर राज्यात सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत हा दंडक आणण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याने शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.