Mon, Aug 03, 2020 14:39होमपेज › Kolhapur › पोल्ट्री व्यवसायाला दररोज 200 कोटींचा फटका

पोल्ट्री व्यवसायाला दररोज 200 कोटींचा फटका

Last Updated: Mar 25 2020 10:09PM
कोल्हापूर : सुनील कदम

कोरोना विषाणूच्या आपत्तीमुळे देशातील पोल्ट्री व्यवसायाचे दररोज 200 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. देशांतर्गत बाजारपेठांमध्ये मागणी नाही आणि निर्यातही बंद असल्याने पोल्ट्री उत्पादने नष्ट करण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. आणखी काही दिवस ही परिस्थिती अशीच राहिल्यास हा व्यवसाय पूर्णपणे मोडीत निघण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

चीनमध्ये साधारणत: नोव्हेंबरमध्ये कोरोना साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला. सुरुवातीच्या काळात ही साथ नेमकी कशामुळे उद्भवली आहे, याचे निदान होत नव्हते. केवळ चिनी खाद्यसंस्कृतीला केंद्रबिंदू करून वेगवेगळ्या शक्याशक्यताच चर्चेत होत्या. तशातच चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होत असल्याची तद्दन खोटी आवई कुठून तरी उठली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती देशभर फैलावली. परिणामी, नोव्हेंबरपासूनच देशातील पोल्ट्री उत्पादनांना घरघर लागली. जसजसा कोरोनाचा फैलाव वाढत जाईल, तसतशा कोरोना आणि चिकन विषयक अफवाही देशभर फैलावत गेल्या आणि अवघ्या देशातील चिकन व्यवसायाचीच मुंडी मुरगाळली गेली.

चिकन आणि कोरोनाविषयक अफवांच्या लाटेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी शासन आणि पोल्ट्री व्यावसायिकांच्या पातळीवर बर्‍यापैकी प्रयत्न झाले; मात्र त्याला फारसे यश आले नाही. काही ठिकाणी समाजातील प्रतिष्ठित व्यक्‍ती आणि पोल्ट्री व्यावसायिकांच्या पुढाकाराने चिकन महोत्सवही आयोजित केले गेले; पण अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. मालाला उठावच नसल्यामुळे अनेक शहरांतील पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्री उत्पादने फुकट वाटून टाकली. विशेष म्हणजे, कोरोनाच्या धास्तीने या फुकटच्या मालालाही काही भागांमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काही भागांतील पोल्ट्री व्यावसायिकांनी लाखो अंडी आणि  कोंबड्यांची लहान लहान पिले अक्षरश: जमिनीत गाडून टाकली.

भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा अंडी उत्पादक देश आहे, तर जगातील पाचव्या क्रमांकाचा चिकन निर्यात करणारा देश आहे. कोरोनामुळे गेल्या जवळपास एक-दीड महिन्यापासून जगभरातील अनेक देशांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी, देशातून होणारी अंडी आणि चिकनची  निर्यात पूर्णपणे बंद आहे. तशातच देशांतर्गत बाजारपेठेतही अंडी आणि चिकनला मागणी नाही. त्यामुळे संपूर्ण देशभरातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.