होमपेज › Kolhapur › आईचं पत्र हरवणार !

आईचं पत्र हरवणार !

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 12:43AMकोल्हापूर : शेखर दुग्गी

पोस्टमन दिसला की लोकांचे चेहरे आनंदाने खुलतात. कुणाला वाटते पेन्शन मंजुरीचं पत्र आलं. तर कोणाला सैन्यात असलेल्या मुलाचं ख्यालीखुशाली मिळेल. नोकरी लागल्याची बातमीसुद्धा पोस्टमनच देतो. जग बदललं. मोबाईलने जग आणखीच जवळ आले; पण तरीही पोस्टमन मामाचं महत्त्व कमी झालं नाही. दुसर्‍यांना सांगावा देणार्‍या पोस्टमनचे आयुष्य मात्र खडतर झाले आहे. हक्काच्या मागण्यांसाठी त्याला आजही संघर्ष करावा लागत आहे. 

लोकांना विश्‍वासहार्य आणि आपुलकीची सेवा देणार्‍या पोस्टाचे जाळे खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांत पसरले आहे. पोस्ट आणि ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोस्टमन होय. खांद्याला टपालाची पिशवी, हातात सायकल आणि खाकी गणवेशातील हा पोस्टमन मामा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच परिचयाचा आहे. सर्वांना ख्यालीखुशाली सांगणारा पोस्टमन आजही अविरत सेवा बजावत आहे. 

कोल्हापूरचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरे, उपनगरे वाढत आहेत. त्यात उंचच्या उंच इमारती, बंगले यांची भर पडत आहे. त्यामुळे पोस्टमनची पायपीटही वाढली आहे. आजही त्यांना शहरासह ग्रामीण भागात पायपीट करून किंवा सायकलवरूनच टपाल वितरीत करावे लागते.

पोस्टात पोस्टमन आणि एमटीएसची अनेक पदे रिक्त आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पोस्टमन आणि एमटीएस(ग्रुप डी) पदाची भरती झालेली नाही. रिक्त पदांमुळे पोस्टमनांवर कामाचा ताण वाढत आहे. पोस्टात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पोस्टमन आणि एमटीएस पदे रिक्त असल्याने पोस्टमनने सांगितले. इंटरनेट, स्मार्टफोनमुळे पोस्टमनचा पत्रांचा भार हलका झाला असला तरी मासिके, कंपन्यांचे अहवाल, टेलिफोन बिल, विमापत्रे, बँक स्टेटमेंट, घरफाळा बिल यांचे प्रमाण वाढले आहे. आज लोक गगनचुंबी इमारतीमध्ये सुखाने राहत आहेत. परंतु, त्यांच्या पत्रांचे वाटप करणारा पोस्टमन मात्र अजूनही जमिनीवरच आहे.