Thu, Dec 03, 2020 07:15होमपेज › Kolhapur › टपाल खात्याने टाकली कात!

टपाल खात्याने टाकली कात!

Last Updated: Oct 08 2020 1:17AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

जगभरामध्ये 9 ऑक्टोबर हा ‘जागतिक टपाल दिन’ आणि 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर हा कालावधी भारतामध्ये राष्ट्रीय टपाल सप्‍ताह म्हणून साजरा केला जातो. पोस्टमनकडून दिली जाणारी पत्रे ते डिजिटल कार्यप्रणालीपर्यंतचा प्रवास अशाप्रकारे टपाल खात्यामध्ये सातत्याने नवनवे बदल झाले आहेत. या निमित्ताने दैनिक ‘पुढारी’ संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘डिजिटल युगातील बदलते टपाल खाते’ या विषयावर ऑनलाईन संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात टपाल खात्याची सुरुवात झाली. तेव्?हापासूनच टपाल खात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संदेशांची देवाण-घेवाण हा प्रमुख उद्देश असणार्‍या टपाल खात्याने काळानुसार अनेक सकारात्मक बदल स्वीकारत वाटचाल सुरू ठेवली आहे. याच विषयावर शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी 5 वाजल्यापासून या संवादाचे थेट प्रसारण दै. ‘पुढारी’च्या अधिकृत फेसबुक पेजवरून होणार आहे. या कार्यक्रमात डाकघर कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक ईश्‍वर पाटील मार्गदर्शन करणार आहेत. 

कार्यक्रमात टपाल खात्याची पार्श्‍वभूमी व इतिहास, पोस्टमनच्या बदललेल्या कामांची माहिती, ग्रामीण व शहरी भागात दिल्या जाणार्‍या सुविधा, डिजिटल कार्यप्रणाली आणि त्याचा विकास, इतर सुविधा उदा. बँकिंग, पासपोर्ट, आधार व पॅनकार्ड, टपाल पेटी डिजिटल योजना, टपाल लॉजिस्टिक विभागाचे महत्त्वपूर्ण कार्य, पोस्टाच्या बचत योजना, लॉकडाऊनच्या काळात दिलेले यशस्वी योगदान, आजपर्यंत मिळालेले पुरस्कार आणि त्यांचे स्वरूप, नवीन योजना आणि उद्दिष्ट्ये यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या उपक्रमात Pudharionline या फेसबुक पेजला लाईक करून सहभागी व्हावे.