Thu, Sep 24, 2020 06:49होमपेज › Kolhapur › ‘अभिनव‘ पॅटर्नमुळे मतदान सुरळीत

‘अभिनव‘ पॅटर्नमुळे मतदान सुरळीत

Published On: Apr 24 2019 1:38AM | Last Updated: Apr 24 2019 1:16AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील 71 अतिसंवेदनशील केंद्रांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर होते. सीसीटीव्ही कॅमेरे, जलद कृती दलाची पथके, मतदार केंद्राबाहेरील कार्यकर्त्यांवर नियंत्रण, हुल्‍लडबाजी रोखणे अशा विविध पातळीवर ‘अभिनव’ पॅटर्न लागू पडला आहे. जिल्ह्यात किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. 

जिल्ह्यात 71 बूथ क्रिटिकल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार, दबावतंत्र हाणून पाडण्याच्या उद्देशाने प्रत्येक बूथकरिता एक पोलिस व एक होमगार्ड तैनात होते. यासह जिल्ह्यातील सर्व 31 पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व त्यांच्यासोबत 62 पोलिस व 62 होमगार्ड असे गस्त पथक नेमण्यात आले. कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघात 1842 इमारतींमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. या इमारतींमध्ये एकूण 3321 मतदान बूथ कार्यान्वित होती; तर 57 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बूथ उभारण्यात आली. या सर्व बूथसाठी 1992 पोलिस व 1323 होमगार्डची नेमणूक करण्यात आली. तसेच इमारत व शंभर मीटर अंतरावरील देखरेखीसाठी पाचशे पोलिस थांबून होते. 

शहरावर लक्ष केंद्रित

शहरातील लक्षतीर्थ वसाहत, राजेंद्रनगर, सुभाषनगर, यादवनगर, शास्त्रीनगर, वारे वसाहत, संभाजीनगर, सुधाकर जोशीनगर, पाचगाव, मोरेवाडी, विचारेमाळ, सदर बाजार, कनाननगर यासारखे भाग अतिसंवेदनशील मतदान केंद्रांमध्ये समाविष्ट होते. 

स्पेशल फोर्सची मदत

तामिळनाडू व मध्य प्रदेशातील स्पेशल आर्म फोर्सचे तीनशे जवान कोल्हापुरातील बंदोबस्तासाठी होते. तसेच त्यांच्या मदतीला राज्य राखीव कृती दलाचे 300 जवान असा जलद कृती दलांचा ताफा मागविण्यात आला होता. यासह बाहेरच्या जिल्ह्यातील पंधराशे पोलिस आले होते. विधानसभेच्या दहा मतदारसंघांकरिता प्रत्येकी एक उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी व त्यांच्यासोबत दहा जणांचे जलद कृती दलाचे पथक कार्यरत होते.