Wed, Sep 23, 2020 21:43होमपेज › Kolhapur › घड्याळाला धोक्याचा गजर!

घड्याळाला धोक्याचा गजर!

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 11:18PMराशिवडे : प्रवीण ढोणे

गेले वर्षभर धुमसत असणारा राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीअंतर्गत राजकीय वर्चस्ववाद अखेर उफाळला आहे. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या गटाच्या स्वतंत्र बैठका सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा वर्चस्ववाद राष्ट्रवादीला धोक्याचा गजरच समजला जातो. 

गतनिवडणुकीमध्ये के. पी. पाटील यांना प्रकाश आबीटकर यांच्याकडून पराभवास सामोरे जावे लागले. के.पीं.च्या पराभवामागे काँग्रेसचा मोठा हातभारही होता. 2010 मध्ये झालेल्या भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या सत्तेला सुरुंग लावत राष्ट्रवादीने शेकापच्या पाठबळावर ‘भोगावती’ची सत्ता एकतर्फी जिंकली. यामागे ए. वाय. यांचे मोठे योगदान होते, हे सर्वश्रुत आहे.

‘भोगावती’च्या अध्यक्षपदी के.पीं.चे जावई धैर्यशील पाटील यांची निवड होताच ए. वाय. आणि धैर्यशील यांच्यातील राजकीय वादाला सुरुवात झाली. टेंडरसह कार्यकर्त्यांच्या बदल्यांसाठी ए.वाय.समर्थक संचालकांना टाळले जाऊ लागले. महाजंबो नोकरभरतीमध्ये ए.वाय. यांचा हस्तक्षेप सासरे के.पी. व जावई धैर्यशील यांना रुचला नाही. 2017 च्या ‘भोगावती’च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शेकापच्या पॅनेलमधून ए. वाय.समर्थकांना कात्रजचा घाट दाखविला गेला आणि यावेळी राष्ट्रवादीच्या सत्तेची माशी शिंकली. काँग्रेसकडून स्वत: पी.एन. निवडणूक रिंगणात उतरल्याने राष्ट्रवादीची तारांबळ उडाली. तर, गठ्ठा मतदान असणार्‍या ए.वाय.समर्थकांना उमेदवारी देताना टाळल्याने या कारभारी संचालकांनी हिसका दाखविल्याने ‘भोगावती’वर एकतर्फी काँग्रेसची सत्ता आली. 

सध्या विधानसभा निवडणुकीचे नगारे राधानगरी मतदारसंघामध्ये सुरू आहेत. पुन्हा के. पी. पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन चौगले हे ए. वाय. पाटील यांच्यासाठी बैठका घेत आहेत. के. पीं.साठी जावई धैर्यशील पाटील स्वतंत्र बैठका घेत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जरी अवधी असला, तरी ए.वाय. व के.पी. गटांकडून स्वतंत्र बैठका सुरू आहेत. प्रामुख्याने राष्ट्रवादीअंतर्गत गेली सात वर्षे ‘भोगावती’च्या सत्तेपासून धुमसणारा वाद चव्हाट्यावर आला आहे.

धैर्यशील पाटील यांचा बोलविता धनी कोण?

सात वर्षांपासून धैर्यशील व ए.वाय. यांचा राजकीय वाद सुरू आहे.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन चौगले यांनी बोलाविलेल्या बैठकीला धैर्यशील पाटील यांच्यासह मोजक्याच कार्यकर्त्यांनी दांडी मारली आणि स्वतंत्रपणे खिंडी व्हरवडे येथे आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या सर्व राजकीय घडामोडींमागचा बोलविता धनी कोण, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे ए.वाय.समर्थक चांगलेच तापले आहेत.