गडहिंग्लज : प्रवीण आजगेकर
विधानसभेच्या निवडणुकीसाठी तब्बल वर्षभराचा कालावधी शिल्लक असला, तरी चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र आतापासूनच इच्छुकांची जोडणा सुरू झाली आहे. या मतदारसंघामध्ये मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नेसरीमध्ये या इच्छुकांचे राजकीय मेळावे जोरात सुरू झाले आहेत. सर्वप्रथम सेनेच्या वतीने येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने येथे दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हल्लाबोल सभा घेतली, तर भाजपने येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकर्यांसाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला. नेसरीला ऐतिहासिक वेगळी पार्श्वभूमी असून, येथील पावनखिंड इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. याचाच आधार घेत नेसरीच्या पावनखिंडीमध्ये राजकीय पक्षांच्या मेळाव्याच्या माध्यमातून लढाया सुरू आहेत. यामधून सर्वच पक्ष आपली राजकीय ताकद तपासून पाहत आहेत.
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादीच्या आ. संध्यादेवी कुपेकर यांच्याकडे आहे. कुपेकर घराण्याची ही तिसरी टर्म असून, यापूर्वीही कुपेकरांचे पूर्वाश्रमीच्या गडहिंग्लज मतदारसंघावर प्रचंड मोठे वर्चस्व होते. कुपेकर घराण्यामध्ये उमेदवारीवरून बंडखोरी करून संध्यादेवी यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी सवतासुभा घेत त्यावेळी जनसुराज्यमधून उमेदवारी घेऊन लढले होते. त्यानंतर त्यांनी सेनेमध्ये प्रवेश करून त्यामधून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नेसरीच्या मैदानावर शिवसेनेकडून शेतकरी संवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी या सभेत सरकारवर टीकेची झोड उठवत राष्ट्रवादीवरही टीकास्त्र सोडले होते. या सभेसाठी शिवसेनेने कार्यकर्त्यांची चांगली गर्दी जमवली होती.
हा मेळावा प्रत्यक्ष संग्रामसिंह कुपेकर यांच्या घरच्या मतदारसंघामध्ये झाल्याने त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. सेनेकडे सध्या उमेदवारीसाठी संग्रामसिंह कुपेकर, प्रा.सुनिल शिंत्रे, प्रभाकर खांडेकर हे तिघेजण प्रयत्नशील आहेत. यामध्ये कोण बाजी मारेल हे अद्याप सांगता येत नसले तरी सेनेने येथे मेळावा घेवून ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.
यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही याठिकाणी हल्लाबोल सभा घेवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. या सभेत राष्ट्रवादीकडून आगामी काळात विदयमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याऐवजी डॉ.नंदा बाभूळकरांना उमेदवारी देण्याची मागणी दस्तूरखुदद जिल्हयाचे राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनीच केली. याविषयावर नंतर जोरदार चर्चाही झाली. डॉ.नंदा बाभूळकर यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा गेले काही दिवस सुरू असल्याने याचाही धागा पकडत मुश्रीफ यांनी बाभूळकरांना समोरच्या उपस्थित गर्दीची साक्ष ठेवत राष्ट्रवादीला कोणतीच अडचण नसल्याचे स्पष्ट केले होते.
या दोन्ही पक्षांच्या मेळाव्या झाल्यापाठोपाठ भाजपानेही येथे मोबाईल पशुचिकीत्सालयाचा प्रारंभ करत दोन्ही पक्षांच्या ताकदीने गर्दी जमा करण्याचा प्रयत्न केला. भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या रमेश रेडेकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह भाजपाच्या सर्वच पदाधिकार्यांना एकत्र करत शेतकरी अभियानाच्या माध्यमातून येथे भाजपाची ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला.
नेसरीच्या या मैदानावर एका पाठोपाठ एक अशी तीनही पक्षांचे मेळावे झाल्याने याठिकाणी होणार्या गर्दीच्या हिशोबातून प्रत्येकाने आपल्या मतांची बेरीज डोळ्यासमोर ठेवली असून त्यामधून आगामी काळातील आकडेमोड करण्यास प्रारंभही केला आहे. यापूर्वीच्या सभा व आताच्या सभामध्ये फारच फरक असून सभा हायटेक स्वरूपात केल्या जात आहेत. भव्य स्टेज व सभामंडप, लोकांसाठी वाहतूक व्यवस्था हेच आजच्या सभांसाठी महत्वाचे ठरत असून प्रत्यक्षात मात्र याठिकाणी आलेली गर्दी कोणाच्या सोबत जाते हे निकालाशिवाय नक्कीच समजत नाही. नेसरीच्या खिंडीत पक्षांच्या सुरू असलेले या राजकीय लढाया मात्र मतदारसंघामध्ये जोरदार चर्चेला जात आहेत.
गर्दी अन् मेळाव्यांची गणिते
या तिन्ही मेळाव्यांना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे येथे जमा झालेली गर्दी नेमकी कोणासोबत होती, याबाबत आजच्या घडीला कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. तरीही आयोजकांना मात्र आपल्या सभेला आलेले सगळेच आपल्यासोबत आहेत असे वाटत असून, त्याच हिशेबाने प्रत्येकाचे गणित सुरू झाले आहे.