Tue, Aug 11, 2020 22:17होमपेज › Kolhapur › बालेकिल्ल्यात जयंत पाटील यांना आव्हान

बालेकिल्ल्यात जयंत पाटील यांना आव्हान

Published On: May 26 2019 1:44AM | Last Updated: May 26 2019 12:58AM
इस्लामपूर ः मारुती पाटील

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील धक्‍कादायक निकालाने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवरही परिणाम पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यापुढील आव्हान आणखी तगडे झाले आहे. या विजयाने विरोधी विकास आघाडीचा आत्मविश्‍वास मात्र वाढणार आहे. 

खा. राजू शेट्टी यांनी काँगे्रस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यापासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलत गेली. शेट्टी यांची काँगे्रस-राष्ट्रवादीशी झालेली जवळीक आजपर्यंत त्यांना साथ देणार्‍या अनेकांना रुचली नव्हती. अनेक लोक तसे उघड बोलूनही दाखवत होते. आता निवडणूक निकालातून लोकांची ही नाराजी स्पष्टच झाली आहे. 

गेल्या निवडणुकीत  शेट्टी यांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 23 हजारांचे मताधिक्क्य मिळाले होते. यावेळी काँगे्रस-राष्ट्रवादीची साथ असतानाही त्यांना अवघे 16 हजार 84 चे मताधिक्क्य मिळाले. यावरून जयंत पाटील यांचे राष्ट्रवादीचे भक्‍कम संघटन तसेच गावोगावी मंत्रीपदाच्या काळात केलेली विकासकामे, राजारामबापू उद्योग समूहाच्या माध्यमातून दिलेला रोजगार यालाही लोकांनी साथ दिली नाही, असेच दिसून येत आहे. आजपर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत 50 हजारांच्यापुढे मताधिक्क्य घेणार्‍या जयंत पाटील यांना शेट्टी यांना मात्र मताधिक्क्य देण्यात यश आले नाही. 

धैर्यशील माने यांची जोरदार लढत...

काँगे्रस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे सुरुवातीला  शेट्टी यांची बाजू भक्‍कम वाटत होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी ना. सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला. संपूर्ण मतदारसंघात  शेट्टी यांच्या पाडावासाठी सक्रिय राहत प्रचार यंत्रणेत पूर्ण सहभाग घेतला होता.  

विकास आघाडी एकसंघ...

 विकास आघाडीचे नेते (कै.) नानासाहेब महाडिक यांनी आघाडीचा मेळावा घेऊन  माने यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर  माने यांच्या प्रचारासाठी विकास आघाडीचे मंत्री खोत, गटनेते राहुल महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, सी. बी. पाटील, विक्रम पाटील, सम्राट महाडिक, वैभव शिंदे, गौरव नायकवडी, अभिजित पाटील, जयराज पाटील आदींसह सर्वच नेते मतभेद विसरून एकदिलाने मैदानात उतरले. त्याची फलश्रृतीही निकालातून पाहायला मिळाली आहे. काँगे्रस-राष्ट्रवादीची साथ असूनही इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शेट्टींना अपेक्षित मतदान मिळाले नाही. त्यामुळे मतदारांना ही युतीच मान्य नव्हती हे स्पष्ट होत आहे. या निकालामुळे काही महिन्यावरच येऊन ठेपलेली विधानसभेची निवडणूकही चुरशीची होणार यात शंका नाही. 

शेट्टींच्या पराभवाने सदाभाऊंचे पालकत्व सिद्ध

गेल्या दोन निवडणुकीत शेट्टी यांच्या विजयासाठी स्टार प्रचारक म्हणून भूमिका बजावणारे सदाभाऊ खोत या निवडणुकीत मात्र शेट्टी यांच्या पराभवासाठी आक्रमक झाले होते. त्यातच महायुतीच्या नेत्यांनी या मतदारसंघाचे पालकत्व  खोत यांच्यावर सोपविले होते. खोत यांनी  शेट्टींचा वचपा काढून नेत्यांनी दिलेली पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.