Sat, Feb 29, 2020 18:42



होमपेज › Kolhapur › चूक कोणाची; फटका कोणाला?

चूक कोणाची; फटका कोणाला?

Published On: Jun 17 2019 2:10AM | Last Updated: Jun 17 2019 12:52AM




कोल्हापूर : गौरव डोंगरे 

तत्कालीन पोलिस अधीक्षक सुखविंदर सिंह यांनी अधिकार्‍यांच्या पगाराआधी कर्मचार्‍यांचे पगार काढा, असे आस्थापनेला बजावले होते. पगाराचे काम चालू महिन्यात पूर्ण करून 1 तारखेला प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होतील, असा कटाक्ष ठेवला होता. अशा आठवणी पोलिस कर्मचारी सांगत आहेत. आस्थापनातील काहींच्या अनास्थेमुळे अनेकांना कर्जाच्या हप्त्यांपोटी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 1 हजार ते 2,500 रुपयांचा फटका कर्जदार पोलिसांना बसण्याची शक्यता आहे. 

आस्थापनेवर नाराजी

पोलिस कर्मचार्‍यांचे पगार काढण्याचे काम करणार्‍या आस्थापनेतील काही कर्मचार्‍यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्‍त होत आहे. कामाची वेळ सुरू झाल्यापासून  सुट्टी होईपर्यंत चहा, जेवण, शतपावली यासाठी दिल्या जाणार्‍या वेळेचा कामावरही परिणाम होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अकरा ते बारा चहाची सुट्टी, दीड ते अडीच जेवण, चार ते पाच वाजता चहा, मित्रमंडळींसोबत गप्पा अशातून फावल्या वेळात काम होत असल्याची खंत बोलून दाखविली जात आहे. 

जून महिन्यातील पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार लागू श्रेणीच्या फरकासह निघणार असल्याने विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षभरात पगाराला विलंब होण्याची ही तिसरी वेळ असल्याचे बोलले जात आहे.

व्याजाने पैसे घेण्याची वेळ

खाबूगिरी करणार्‍या नाममात्र पोलिसांमुळे संपूर्ण खात्याची बदनामी झाली आहे. परंतु, पगार वेळेवर न झाल्याने अनेक स्वाभिमानी पोलिस कर्मचार्‍यांवर व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाच्या वाईट प्रसंगात खंबीरपणे पाठीवर विश्‍वासाने हात ठेवणार्‍या पोलिसांच्या मदतीला कोणीही पुढे येत नसल्याची सल काहींनी बोलून दाखविली.