होमपेज › Kolhapur › हॉर्न वाजवा, ‘पार्सल’ मिळवा!

हॉर्न वाजवा, ‘पार्सल’ मिळवा!

Last Updated: Nov 18 2019 1:26AM
कोल्हापूर : गौरव डोंगरे

गांजाची खुलेआम विक्री कोणाच्याही नजरेस न पडणारी ही बाब आश्‍चर्यकारक म्हणावी लागेल. पान टपरी, किराणा दुकानांत शंभर रुपयांत पुडीतून गांजा पुरवला जातो. शहराच्या मध्यवर्ती भागातही अशी राजरोस विक्री सुरू आहे. गुटखा, माव्यासोबत गांजाचा काळाबाजार फोफावत चालल्याचे भयावह चित्र आहे. नियमित गिर्‍हाईकाला तर वाहनाचा हॉर्न मारताच पुडी हातात आणून दिली जाते.

शहरातील झोपडपट्टीत ‘शांत’पणे गांजाची विक्री चालते. दाम्पत्यावर अनेकदा छापा टाकूनही त्यांनी हा धंदा सोडलेला नाही. पांजरपोळात एमएसईबी कार्यालयाजवळून जरी हॉर्न दिला, तरी गांजा जागेवर पोहोच केला जातो. प्रतिभानगरात अशीच व्यवस्था असल्याचे दिसून येते. ‘बबलू’ एका फोनवर गांजा आणून देतो. करवीर तालुक्यातील जुन्या वाड्यांच्या गावात गांजा विक्रीत ‘खाडा’ पाडला जात नाही. देवकार्याच्या नावाने येथून गांजाची विक्री केली जाते. विक्रमनगरमध्ये कधीही जा, तुम्हाला गांजा मिळणार याची खात्री आहे. पंचगंगा नदीघाटावर पवित्र मंदिराला खेटूनच ‘शिवा’ आपले गांजा विक्रीचे दुकान चालवतो आहे. तर मोरेवाडी रस्त्यावरील ओढ्याशेजारील दुकानातच दिवसभर महाविद्यालयीन तरुणांची रांगच लागलेली पाहायला मिळते.

परप्रांतीय कामगार हक्‍काचे गिर्‍हाईक

कोल्हापूर जिल्ह्यात कामानिमित्त राहणारे परप्रांतीय कामगार, तरुण हे गांजाचे सेवन करत असल्याचे दिसून येते. परराज्यातून आलेले हे कामगार गांजा विक्रेत्यांचे हक्‍काचे गिर्‍हाईक आहे. कष्टाची कामे करणारे हेच कामगार स्वत:चा शीण घालविण्यासाठी गांजाचे झुरके ओढत असल्याचे दिसून येते. 

शेजारील जिल्ह्यांतून खरेदी

मिरज, निपाणी, आरग, सांगली भागातून मोठ्याप्रमाणात गांजा शहरात आणला जातो. पोत्याने आणलेला गांजा महिनोंमहिने किरकोळ-किरकोळ प्रमाणात विक्री करुन अनेकांनी आपली दुकानदारी चालवली आहे. जिल्ह्यात कोठेही याचे उत्पन्‍न नसले तरी ही शेजारील जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात आवक केली जाते.

आरोग्याला घातक 

गांजासोबत काहींकडून व्हाईटनर ट्युब, रबर चिकटविण्याचे सोल्युशन याचे सेवन केल्याचे समोर आले आहे. या सर्वच घटकांचा शरीरावर अत्यंत घातक परिणाम होतो. श्‍वसनाचे आजार यासह मेंदू विकार, डोळ्यांची जळजळ, फुफ्फुसाचे आजार जडत असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.