Thu, Jul 09, 2020 23:20होमपेज › Kolhapur › पिस्तूलधार्‍यांच्या दादागिरीला आवर घालण्याची गरज

‘पिस्तूल स्वरक्षणासाठी की धमकावण्यासाठी’

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 2:18AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विठ्ठल पाटील

कमरेला पिस्तूल लावायचे आणि रुबाब करीत समाजात वावरायचे, ही काहीजणांची फॅशन झाली आहे. पिस्तूल परवाना स्वरक्षणासाठी की दुसर्‍यांना धमकावण्यासाठी, असे कोडे सर्वसामान्यांना पडले आहे. ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूर तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविक आणि पर्यटकांनाही त्याचा त्रास होऊ लागला तर कोल्हापूरची बदनामी होईल, अशी भीती नागरिक व्यक्‍त करीत आहेत. 

खेळाच्या मैदानापासून महाविद्यालयांच्या आवारापर्यंत आणि गल्लीपासून हॉटेलच्या काऊंटरपर्यंत पिस्तूलधार्‍यांच्या दादागिरीला आवर घालण्याची वेळ आली आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांपासून पंचातय समिती, जिल्हा परिषदेच्या सभागृहापर्यंत आणि नगरपालिका, तसेच महानगरपालिकेच्या सभागृहातही काहीजण पिस्तूलसह प्रवेश करतात, अशी नेहमीच चर्चा असते. पिस्तूलची ही क्रेझ राजकीय क्षेत्रातील संबंधितांपासून ते ठराविक व्यापारी आणि तुरळक प्रमाणात उद्योजकांपर्यंतही असल्याचे पोलिसांकडील परवानाधारकांच्या नोंदीवरून स्पष्ट होते.  

हवेत गोळीबार करण्यापासून ते थेट शरीरावर गोळ्या झाडण्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. महाविद्यालयीन तरुणांपासून सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणातून जिल्ह्यात गोळीबार झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधान परिषद आणि लोकसभेच्या निवडणूक काळात अथवा निकालांनंतरही सार्वजनिक ठिकाणी गोळीबार झाल्याच्या नोंदी पोलिसांच्या दप्‍तरी आहेत. 

कागल, चंदगड, राधानगरी, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात राजकारणासह कौटुंबिक वादातूनही गोळीबार आणि खुनाचे गुन्हे घडले आहेत. वास्तविक, पिस्तूल अथवा बंदूक ही स्वरक्षणासाठी म्हणून परवाना काढून घेतली जाते; पण त्याचा वापर वेगळ्याच कारणासाठी होत असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. म्हणूनच दिलेले परवाने योग्य कारणासाठीच वापरले जातात का आणि नवीन परवाने घेणार्‍यांना खरोखरच गरज आहे का, याची पडताळणी करण्याची वेळ आता जिल्हा प्रशासनावर आली आहे. किरकोळ कारणावरून किंवा गाडी मागे-पुढे घेण्याच्या  वादातून जर हवेत गोळीबार होत असेल, तर त्याची गंभीर दखल घ्यायलाच हवी, अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. परवानाधारक पिस्तूल अथवा बंदूक वापरणार्‍यांकडून इतरांच्या जीवाला धोका पोहोचणार नाही, याची काळजी  प्रशासनानेही घेण्याची मागणी त्यामुळेच पुढे येत आहे.