Sun, Sep 27, 2020 01:38होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना पेट्रोल-डिझेल बंदी

कोल्हापूर : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना पेट्रोल-डिझेल बंदी

Last Updated: Mar 26 2020 12:31AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा आहे. मात्र, अनावश्यक पेट्रोल भरून रस्त्यावर होणारी केवळ गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून पेट्रोल पंपांवर रेशनिंग करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीचा गैर फायदा घेऊन जीवनावश्यक वस्तूंची भाव वाढ करणाऱ्या दुकानदारांवर तसेच खासगी दवाखाने बंद करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.

जिल्हाधिकारी  देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली आहेत. पण काही ठिकाणी अजूनही गर्दी होत आहे. त्याचा गैरफायदा दुकानदारांकडून भाव वाढवून  घेतला जाण्याची शक्यता आहे. असा कोणताही प्रकार विक्रेत्याने  करू नये, असा प्रकार आढळल्यास कारवाई केली जाईल. या विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी वाहतुकीत अडथळा होवू नये, यासाठी विविध अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात यासाठी विविध प्रकारचे पास, वाहन परवाने देण्याचे निर्देश दिले आहेत. 

खासगी डॉक्टर्सनी काही ठिकाणी आपले खासगी दवाखाने बंद केल्याचे आढळून आले आहे. हा आपला कठीण काळ आहे. यावेळी आपण पुढे यावे आणि आपले दवाखाने सुरू करावेत, असे आवाहन करून जिल्हाधिकारी म्हणाले, दवाखाने बंद ठेवल्यास त्यांच्यावर निश्चित आपत्ती व्यवस्थान कायदेंतर्गत कारवाई केली जाईल. शिवाय मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी रद्द केली जाईल. काही ठिकाणी अनावश्यक दुचाकी, चारचाकी वाहने घेवून नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. याचा विपरित परिणाम इतरांवर होणार आहे. हे लक्षात घेवून उद्यापासून पंपांवर पेट्रोल डिझेलचे रेशनिंग करण्यात येणार आहे. खासगी वाहने, व्यक्ती यांच्याकडे परवाना, ओळखपत्र असल्याशिवाय त्यांना इंधन पुरविले जाणार नाही. हे इंधन शासकीय तसेच अत्यावश्यक सेवेसाठी राखीव ठेवले जाईल. याचा अर्थ इंधन कमी आहे असा नसून, पूर्ण पुरेसा साठा असून, फक्त रस्त्यावरील गर्दी टाळणे हा उद्देश आहे.  नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

 "