Wed, Sep 23, 2020 21:04होमपेज › Kolhapur › महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल सर्वांत महाग

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल सर्वांत महाग

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 1:51AMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले  

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. केंद्राचे विविध कर सर्व राज्यांवर एकसारखेच आहेत; पण महाराष्ट्रात अतिरिक्‍त सेस करामुळे पेट्रोलवर 9 रुपये, तर डिझेलवर एक रुपये कर आकारला जातो. त्यामुळे पेट्रोलचे दर 29 जानेवारी रोजी प्रतिलिटर 80 रुपये 77 पैसे, तर डिझेल 67 रुपये 18 पैसे दर झाले आहेत. 

इंधनाच्या दरावर पूर्वी केंद्र सरकारचे नियंत्रण होते. तेव्हा इंधनाच्या प्रतिबॅरलच्या दरावर पेट्रोल व डिझेलचे दर केंद्रीय पेट्रोलियम खाते ठरवत होते. दर पंधरा दिवसांनी पेट्रोल व डिझेल दरात बदल होत होते. केंद्रात भाजप सरकारची सत्ता आल्यानंतर त्यांनी इंधनावरील सरकारचे नियंत्रण हटवले. सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाच्या दरावरून भारतातील पेट्रोल व डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिला. हे करत असताना सरकारने इंधनावर सेल्स टॅक्सऐवजी व्हॅट लागू केला. व्हॅट लागू करत असताना अन्य कोणतेही कर लागू केले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले होते.
प्रत्यक्षात काही राज्यात इंधनावर व्हॅटबरोबर अन्य करही लागू करण्यात आले. व्हॅट रद्द करून जीएसटी लागू करत असताना व्हॅट कर राहणार नाही, असे सांगितले; पण देशात सर्वत्र व्हॅट कर रद्द केला असला तरी पेट्रोल व डिझेलवर व्हॅट आजही कायम आहे. 

विविध राज्यांत व्हॅट कर, लायसन्स फी व डीलर मार्जिन या आधारावर पेट्रोल व डिझेलचे दर ठरतात; पण महाराष्ट्रात या सर्वांव्यतिरिक्‍त आणखी एक कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. गोव्यामध्ये कोणताही कर लागू करण्यात आलेला नाही. कर्नाटक सरकार पूर्वी व्हॅटबरोबर प्रवेश कर आकारत होते. हा कर रद्द केल्याने कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल 7 रुपयांनी स्वस्त आहे. महाराष्ट्रातही जर अतिरिक्‍त सेस कर रद्द केला, तर पेट्रोल 72 रुपये दराने मिळू शकते, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे प्रत्यक्षातील दर व आकारण्यात येणारा कर
54 रुपये 41 पैसे    पेट्रोल मूळ दर
13 रुपये 60 पैसे    व्हॅट 25 टक्के
9 रुपये                 राज्याचा अतिरिक्‍त सेस 
0.23 पैसे              लायसन्स फी
3 रुपये 33 पैसे      वितरकांना मिळणारी रक्‍कम 
80 रुपये 77 पैसे    पेट्रोलचा सध्याचा दर 

52 रुपये 74 पैसे    डिझेल मूळ दर
11 रुपये 7 पैसे      व्हॅट 21 टक्के
1 रुपया                राज्याचा अतिरिक्‍त सेस 
20 पैसे                 लायसन्स फी
1 रुपये 92 पैसे       वितरकांना मिळणारी रक्‍कम 
67 रुपये 18 पैसे     डिझेलचा सध्याचा दर