Fri, Jul 10, 2020 02:00होमपेज › Kolhapur › पवारांना ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात अपयश

पवारांना ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात अपयश

Published On: Apr 04 2019 1:55AM | Last Updated: Apr 04 2019 12:59AM
कोल्हापूर : विजय पाटील 

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्याच कोल्हापूर दौर्‍यात स्थानिक आघाडीतील भळभळत्या जखमांवर काहीच उपचार झाले नाहीत. खा. पवार स्टाईल ‘डॅमेज कंट्रोल’सुद्धा फसले. 
जिल्ह्यातील दोन्ही विरोधी उमेदवार असणार्‍या शिवसेनेच्या धोरणांवर टीका न करता  पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत प्रहार करून आगामी प्रचाराचा रोख स्पष्ट केला. दुसर्‍या बाजूला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या पाठीवर हात टाकून चातुर्याने त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली. 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर खा. पवार यांचा प्रचाराचा पहिलाच कोल्हापूर दौरा झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांच्यासाठी पवार स्टाईलने ‘डॅमेज कंट्रोल’ करणे अपेक्षित होते. खा. महाडिक यांच्याविरोधात काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी प्रा. संजय मंडलिक यांच्या बाजूने शड्डू ठोकला आहे. आ. पाटील गटाकडून ‘आमचं ठरलंय’ असे प्रचाराचे कॅम्पेन सुरू आहे. याउलट राष्ट्रवादीतील माजी शहराध्यक्ष राजू लाटकर व काही नगरसेवकांनीही स्वत:ला प्रचारापासून लांब ठेवल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत खा. पवार ‘डॅमेज कंट्रोल’ साधतील ही अपेक्षा फोल ठरली. मात्र, त्यांच्या या कृतीने ‘आलात तर सोबत; अन्यथा तुमच्याशिवाय’ हा संदेश मात्र दिला गेला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील व जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्याशी खा. पवारांनी संवाद साधला. त्यांच्याकडून आ. सतेज पाटील यांच्या प्रभावक्षेत्राची माहिती घेऊन या ठिकाणी जास्त सक्रिय राहण्याच्या सूचना केल्या. एकप्रकारे काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. शहरातील आघाडीच्या नगरसेवकांनी प्रचारात सक्रिय राहावे, यासाठी त्यांनी आ. हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना कानमंत्र दिला.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. राजू शेट्टी यांची जाहीर स्तुती करुन त्यांच्या राजकीय वलयाचा फायदा राज्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळावा यासाठी साखर पेरणी केल्याचे  स्पष्ट दिसले. खा. शेट्टींसोबत आघाडी असल्याने आगामी विधानसभेसाठी अनेक गोष्टी  राष्ट्रवादीसाठी सोप्या होतील, ही खेळीही यामागे दिसून येते. खा. पवार यांनी जयवंतराव शिंपी, दिनकरराव जाधव व  मुकूंद देसाई आदींसह अनेकांना   व्यक्तीश: फोन करुन विचारपूस करत कामाला लागण्याचे आदेश दिले. तर दुस-या बाजूला शेकाप, आरपीआयचे आघाडीसोबत असणा-या गटांना जास्तीजास्त वेळ देत मेळावे घेण्याच्या सुचना केल्या. 

भाजप-शिवसेनेच्या भव्य प्रचार शुभारंभाच्या तुुलनेत अजूनही काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला एकदिलाने काम करताना चाचपडावे लागत असल्याचे दौर्‍यात दिसले.  दुस-या बाजूला कोल्हापूरच्या प्रलंबित स्थानिक प्रश्‍नांची कसलीही चर्चा या दौ-यात झाली नाही. खा. पवार हे पून्हा 12 एप्रिल व  17 एप्रिल रोजी कोल्हापूर  दौ-यावर येणार असल्याने कदाचीत हा दौरा म्हणजे कुठल्या पिकांवर कोणते औषध फवारावे लागते याची केलेली पाहणी असल्याचीही चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाली आहे. 

सत्तेत नसल्याने राजकीय परवड...

यापूर्वी आघाडीच्या सत्ताकाळात गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असायचे. गृहखात्याच्या धास्तीने  खा. पवार यांच्या भेटीसाठी अनेक दिग्गज ताटकळत असायचे. महाराष्ट्रातील सहकाराचा रिमोट कंट्रोल खा. पवार यांच्याकडे होता. कुठल्या संस्थेला परवानगी द्यायची, कुणाला अनुदान द्यायचे आहे, कुणाच्या संस्थेला अडचणीतून  बाहेर काढायचे? याचा फॉर्म्युला खा. पवार यांच्याकडे  तयार असायचा. त्यामुळे अनेकजण खा. पवार यांची मर्जी खप्पा होऊ नये याची दक्षता घेताना दिसायचे. त्यातून खा. पवार हे ‘डॅमेज कंट्रोल’ सहज साधायचे. पण आता विरोधी पक्षात असल्याने खा. पवारांकडे या मर्यादा असल्यानेही अनेकांनी या दौ-याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. 

  काँग्रेसने टोलवला खा. पवारांकडे चेंडू

आघाडीचा प्रचार आ. सतेज पाटील यांनी करावा याची चर्चा मेळाव्यातील भाषणांतून काहींनी केली. हा प्रश्‍न तसा कॉग्रेसच्या अखत्यारीतील आहे हे उघड आहे. असे असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पाटील-महाडिक वादाची  जखम खोल आहे असा पुनरुच्चार करत ऑपरेशन तुम्हालाच करावे लागतेय असे खा. पवारांना सांगून आपला हात सोडून घेतल्याचे दिसून आले.  

खा. पवारांचे धक्कातंत्र अस्त्र बोथट?

राजकीय जुळवाजुळव अथवा खातेफोड करण्यात खा. पवार यांच्या धक्कातंत्र अस्त्राची ख्याती आहे. यापूर्वी हे अस्त्र खा. पवार गरज पडेल तेथे बिनदिक्कतपणे वापरत आले आहेत. त्यांच्या या अस्त्राचा धसका भल्याभल्या राजकीय नेत्यांनी घेतला आहे. कोल्हापूर दौर्‍यात मात्र खा. पवार यांनी धक्कातंत्र वापरले नाही की, हे अस्त्रच बदलत्या राजकीय पटलावर बोथट झाले? असा प्रश्‍न राजकीय जाणकारांना पडला आहे.