Fri, Jul 10, 2020 02:11होमपेज › Kolhapur › रुग्णांना सर्व सुविधा एकत्र मिळाव्यात

रुग्णांना सर्व सुविधा एकत्र मिळाव्यात

Published On: Oct 26 2018 1:46AM | Last Updated: Oct 26 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी

माणसाला अनेक प्रकारचे आजार असतात. काही आजार अ‍ॅलोपॅथीने बरे होतात, तर काहींना आयुर्वेदाशिवाय पर्याय नसतो. काही आजार होमिओपॅथीने बरे होतात. त्यामुळे यासर्व उपचार पद्धती एकाच छताखाली मिळाल्यास ग्रामीण रुग्णांची सोय होईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्‍त केले. शासकीय रुग्णालयात कमी पैशांमध्ये चांगले उपचार होऊ शकतात; मात्र त्याकडे पाहण्याचा आपला द‍ृष्टिकोन बदलला पाहिजे, असेही ते म्हणाले.

कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये मेंदूच्या आजारावर नेमके ठिकाण दर्शविणारी न्यूरो नेव्हिगेशन सिस्टीम लोकार्पण सोहळा भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहसरकार्यवाहक बागैय्या होते. सिद्धगिरी आरोग्यधामच्या परिसरात हा कार्यक्रम झाला.

भागवत म्हणाले, शिक्षण आणि आरोग्य या दोन सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत. या दोन गोष्टी चांगल्या प्रकारे मिळाव्यात, यासाठी प्रत्येक व्यक्‍ती धडपडत असते. आणि नेमक्या दोन सेवाच सध्या अतिशय महाग झाल्या आहेत. त्यामुळे उच्च तत्त्वज्ञानाची परंपरा असलेल्या भारतात गरिबी, अनारोग्य पसरले आहे. सध्या डॉक्टर खूप पैसे वसूल करतात, असा सार्वत्रिक सूर आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालय हा पर्याय आहे; मात्र लोक जात नाहीत.अलोपॅथी की आयुर्वेदिक असा पॅथींचा अभिनिवेष सोडून वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे. आयुर्वेदातही संशोधन होण्याची आवश्यकता आहे. उपचाराकरिता जे उपलब्ध आहे, त्या एकाच ठिकाणी उपचार करण्याची सोय झाली पाहिजे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. प्रत्येक रोगाला काय उपयुक्‍त पडते, अशी एक चिकित्सा पद्धत आपण अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. शरीर, मन, विचार आणि परिसराची स्वच्छता राखल्यास आजाराची भीती राहणार नाही. त्यासाठी व्यायाम आणि आहार अतिशय महत्त्वाचा आहे. त्याकडे यापुढील काळात लक्ष द्यावे, असेही भागवत म्हणाले.सहसरसंघकार्यवाहक बागैय्या यांनी, सिद्धगिरी मठाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती करण्याचे काम सुरू आहे. जीवनाकडे पाहण्याची द‍ृष्टी बदलण्याचे महत्त्वाचे काम मठावर सुरू असल्याचेे सांगितले.

गरिबांवर मोफत उपचार

कणेरी मठाचे काडसिद्धेश्‍वर स्वामी म्हणाले, गरीब लोकांवर दि. 26 जानेवारीपासून मोफत उपचार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज अंगावर दागिने घालून कारमधून येणारी माणसे पिवळे दारिद्य्र रेषेखालील कार्ड घेऊन येतात आणि मोफत उपचार करून घेतात. खरा गरीब मात्र उपचारापासून वंचित राहत आहे. त्याच्यासाठी आम्ही हितायशी मंडळ स्थापन केले आहे. हे मंडळ कार्ड पाहण्याऐवजी गरिबाच्या थेट घरी जाऊन त्याची खात्री करेल.

स्वागत व प्रास्ताविक डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी केले. यावेळी अखिल भारतीय ग्रामविकास प्रकल्पाचे प्रमुख डॉ. दिनेश, धर्मादाय उपायुक्‍त शशिकांत हेर्लेकर, तानाजी जाधव उपस्थित होते. आभार डॉ. प्रकाश भरमगौडर यांनी मानले. सूत्रसंचालन अक्षय नलवडे यांनी केले.