‘फाय’ फाऊंडेशनचे संस्थापक पंडितराव कुलकर्णी यांचे निधन

Last Updated: Jul 08 2020 1:26AM
Responsive image


इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजीचे पहिले लोकनियुक्‍त नगराध्यक्ष, ज्येष्ठ उद्योगपती आणि ‘फाय’ पुरस्काराचे प्रणेते पंडितराव कुलकर्णी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात रविवारी दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

कर्नाटक सीमेवरील माणकापूर जन्मगाव असलेल्या पंडितराव कुलकर्णी यांनी इचलकरंजीत उद्योजक म्हणून पाय रोवले. लहान वयातच अभियांत्रिकीची आवड असल्याने त्यांनी नावीन्याचा ध्यास घेत हार्डनेस टेस्टिंग मशिन, कार वॉशिंग मशिन यासारखी जगाच्या पाठीवर लौकीक पावलेली उत्पादने तयार केली. पुढे हा उद्योग समूह भरारी घेत देशभर फाय प्रायव्हेट लिमिटेड म्हणून नावारूपास आला. आज ‘फाय’ प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या उद्योग समूहात सुमारे पंचवीस कंपन्या आहेत. जपानच्या ‘केहीन’ या कंपनीबरोबर त्यांनी ‘केहीन-फाय’ असा संयुक्‍त उद्योग प्रकल्प पुणे येथे सुरू केला. आज भारतात तयार होणार्‍या हीरो, होंडा कंपनीच्या वाहनांचे कार्बोरेटर ‘केहीन-फाय’चेच असतात. त्यांचे बंधू शंकरराव कुलकर्णीही अभियांत्रिकी तज्ज्ञ होते. त्यांनी ‘मिरा’ कारची निर्मिती केली होती. परंतु, ती पुढे केंद्र सरकारची मंजुरी न मिळाल्यामुळे रस्त्यावर धावू शकली नाही. परंतु, या मिरा कारच्या निमित्ताने कुलकर्णी बंधूंचा लौकीक देशभर झाला. 

पंडितराव कुलकर्णी यांनी विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल भारतीयांचा गौरव करण्याच्या हेतूने ‘फाय’ फाऊंडेशनची स्थापना केली. यातील ‘राष्ट्रभूषण’ हा ‘फाय’चा सर्वोच्च पुरस्कार आहे. या व इतर फाय पुरस्कारांनी त्यांनी देशातील जयप्रकाश नारायण, बाबा आमटे, लता मंगेशकर, हेमामालिनी, हीरो उद्योग समूहाचे मुंजाल आदी अनेक कर्तृत्ववान, लोकप्रिय व्यक्‍तींचा गौरव केला.  

फायचा पुरस्कार वितरण सोहळा हा संपूर्ण शहरवासीयांसाठी कौतुकाचा विषय ठरत असे. पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अभिनेते दिलीपकुमार, उद्योगपती राहुल बजाज आदींनी उपस्थिती लावली होती.  ‘फाय’ने आपद्ग्रस्तांना मोठी मदत केली आहे. अलीकडेच त्यांनी कोविड विरुद्धच्या लढ्याला मदत म्हणून पी.एम.केअर फंडला 1 कोटींची मदत दिली आहे. 

पहिले लोकनियुक्‍त नगराध्यक्ष
1974 मध्ये इचलकरंजी नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून झाली. तेव्हा पंडितराव कुलकर्णी यांनी नगरविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे मल्हारपंत बावचकर प्रतिस्पर्धी उमेदवार होते. जनतेने त्यांची उमेदवारी उचलून धरली आणि पंडितराव कुलकर्णी नगराध्यक्षपदी विजयी झाले; पण त्यांच्या आघाडीचे अवघे चार नगरसेवक निवडून आले. पालिका सभेत त्यांना विरोध होऊ लागल्याने कामकाज करणे अवघड झाले. अखेर त्यांनी एक वर्षातच राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन कौन्सिल बरखास्तीची शिफारस केली. तेव्हा त्यांनी राजकारणाला रामराम केला तो कायमचाच. त्यानंतर त्यांनी उद्योग क्षेत्रातच आपले कर्तृत्व पणास लावले.