Wed, Apr 01, 2020 01:26होमपेज › Kolhapur › पंचगंगेचे पाणी पेटले; पण प्रचारात मूळ प्रश्‍नांना बगल?

पंचगंगेचे पाणी पेटले; पण प्रचारात मूळ प्रश्‍नांना बगल?

Published On: Apr 23 2019 1:34AM | Last Updated: Apr 23 2019 12:22AM
कोल्हापूर  : राजेंद्र जोशी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता पंचगंगेचे पाणी पेटू लागले आहे. महाआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी परस्परांवर चिखलफेक सुरू केली आहे. एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचा डाव सुरू झाला आहे आणि सोबतीला पैसे आणि प्रलोभने यांचा महापूरही आला आहे. तथापि या सर्व प्रकरणामध्ये नेहमीप्रमाणे कोल्हापूरचे विकासाचे प्रमुख मुद्दे कोसो मैल दूरच राहिले असून नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या आणि उन्नतीच्या या विषयाकडे राजकारणी लक्ष केव्हा देणार, असा प्रश्‍न आता सुजाण मतदारांच्या वर्तुळातून उमटू लागला आहे.

लोकसभेच्या प्रचाराचा नारळ शिवसेना- भाजप युतीने सर्वप्रथम कोल्हापुरात फोडला. या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या 56 इंच छातीला प्राधान्य देत 56 तुकड्यांचे महागठबंधन देशातील नागरिकांना न्याय देऊ शकणार नाही, असा टोला लगावत विरोधी पक्षावर निशाणा साधला. यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पवारांनी मोदींच्या चौकीदारीवर निशाणा साधला आणि जणू तळ ठोकून बसलेल्या पवारांनी बुधवारच्या (ता. 17) गांधी मैदानातील सभेत खासदार मंडलिकांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला केलेल्या विरोधाचा मुद्दा पुन्हा उगाळून काढला. पवार इथवर थांबले नाहीत तर महायुतीचे उमेदवार रात्री कोठे असतात इथपर्यंत प्रश्‍न विचारण्यापर्यंत त्यांनी प्रचाराची पातळी खाली नेऊन ठेवली. याखेरीज जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांचे एकमेकांवरील तोंडसुख घेणे तर सुरूच आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे लक्ष देण्याजोगा विषय शरद पवारांचा आहे. त्यांची प्रचाराची ही सवय कोल्हापूरकरांना काही नवीन नाही. यापूर्वी त्यांनी याच कोल्हापुरातील बिंदू चौकातील सभेत खासदार मंडलिकांचा प्रचार करताना ‘कौन है ये मुन्‍ना?’ असा सवाल केला आणि पुढे संभाजीराजेंच्या महाराणा प्रताप चौकातील सभेतील प्रचारावेळी मंडलिकांंवर टीका करताना ‘बैल म्हातारा झाला’ अशी टिप्पणी केली होती. खानविलकरांच्या सभेत महाडिकांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या राजकारणातील दोन नंबरच्या धंदेवाल्यांना पालापाचोळ्याप्रमाणे फेकून द्या, असे आवाहनही केले होते. याच पवारांनी काँग्रेस राजवटीत दिग्विजय खानविलकरांना विधानसभेचे तिकीट मिळविण्यासाठी दिल्लीपर्यंत त्यांची दमछाक केली होती. महाडिकांना समर्थन दिल्यामुळे अखेर खानविलकरांना एन.के.पी. साळवे, प्रमिलाकाकी यांच्या सोबतीने गांधी कुटुंबाचे किचन कॅबिनेट गाठावे लागले आणि त्यांनी उमेदवारी मिळविली हा भाग निराळा. फडमारू भाषणाने सदाशिवराव मंडलिकांचा अपवाद वगळता त्या त्या वेळी पवारांना साथ दिली हेही नाकारता येत नाही. पण विकासाच्या स्पर्धेत मागे पडलेल्या कोल्हापूरला अशी फडमारू भाषणे किती उपयोगाची, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. 

कोल्हापूर ही उद्योगाची नगरी म्हणून महाराष्ट्रात ओळखली जात होती. या नगरीतून आज उद्योजकांना काढता पाय घ्यावा लागल्याची वेळ आली आहे. शेकडो कोटी रुपये खर्चाचे भांडवली प्रकल्प गेल्या काही महिन्यांमध्ये कोल्हापुरातून विदर्भाकडे सरकले आहेत आणि काहींची तयारी सुरू आहे. शेजारील कर्नाटकात तुलनेने स्वस्त दरात वीज उपलब्ध होऊ लागल्याने एकेकाळी विजेसाठी महाराष्ट्रावर अवलंबून असलेले कर्नाटक आज येथील उद्योगांचे आकर्षण बनते आहे. या प्रश्‍नाची विस्तृत चर्चा लोकसभेच्या प्रचारात आवश्यक होती. पण त्याला उद्योजकांच्या बैठकीचा अपवाद वगळता कोणी जाहीर सभांत स्पर्श केल्याचेही आढळून आले नाही. 

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ हा तर आता चेष्टेचा विषय होतो की काय, अशी स्थिती आहे. या प्रश्‍नासाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी प्राणपणाने ताकद लावली. जनतेने पाठपुरावा केला तरी अजूनही हे खंडपीठ प्रत्यक्षात काही अवतरत नाही, अशी स्थिती आहे. राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम, कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश, शहराचा तीर्थक्षेत्र विकास आणि सह्याद्रीला बोगदा काढून कोकणाला जोडणारी रेल्वे, शहरातील रहदारी नियंत्रणासाठी उड्डाणपुलांची निर्मिती हे सर्व प्रश्‍न खरे तर केंद्र सरकारशी निगडित असल्याने त्याची जाहीर चर्चा होणे अपेक्षित होते. केवळ चर्चाच नव्हे, तर कृतिशील ठोस कार्यक्रम जनतेला सादर करण्याची अपेक्षा होती. पण अजूनही चुलीत पाणी ओतले, 56 इंच छाती याच्या पलीकडे हा प्रचार जात नाही हे दुर्दैव आहे. 

विमानसेवेचा खेळखंडोबा...

कोल्हापूरची विमानसेवा हाही तितकाच महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्‍न आहे. शेजारील बेळगाव, हुबळीतून दररोज दहा-दहा विमाने उड्डाण करू लागली तरी कोल्हापुरात अजूनही धड एक विमान नियमित उड्डाण करेल, अशी स्थिती नाही. कधी विमानतळाचे विस्तारीकरण आडवे येते तर कधी प्राधिकरणाचे नियम आडवे येतात तर कधी ठेका घेतलेली विमान कंपनीच डब्यात जाते. आता तर ज्यांनी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली, त्यांच्या विमानांच्या सुरक्षिततेबद्दल डीजीसीएनेच नोटीस काढली आहे.