Fri, Feb 28, 2020 22:51होमपेज › Kolhapur › रिकामे भूखंड नेमके गेले कोठे?

रिकामे भूखंड नेमके गेले कोठे?

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 24 2018 12:17AMआजरा : ज्योतिप्रसाद सावंत

आजरा नगरपंचायत मालकीच्या सार्वजनिक 10 टक्के जागा नगरपंचायतीच्या ताब्यात संबंधित जागामालकांनी न दिल्याने आजरा नगरपंचायतीकडून रिकाम्या जागा व नगरपंचायत मालकीच्या जागांचा शोध सुरू आहे; या जागा फक्त कागदावरच दिसत असून  रिकामे भूखंड संबंधित जागामालकांनी विक्री केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. 

पूर्वीच्या ग्रामपंचायत व सध्याच्या नगरपंचायतीच्या मासिक सभेत वारंवार हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. केवळ कागदावर असणार्‍या रिकाम्या जागा प्रत्यक्षात मोजमाप केले असता आढळून येत नाहीत. काहींनी सोयीप्रमाणे रिकाम्या जागामध्ये फेरफार करून खंदक, ओढे यासारख्या जागा दाखविल्या आहेत. नगरपंचायतीने ज्या मालकांच्या बिगरशेती आदेशात सार्वजनिक मालकीची रिकामी जागा नसेल व ज्यांनी नगरपंचायतीला अद्याप सार्वजनिक जागा व रस्ते ताब्यात दिलेले नाही, अशा बिगरशेतीमधील जागांना नगरपंचायतीकडून संबंधित भूखंड नोंद न करून घेण्याबरोबरच बांधकाम परवानगीसह इतर सुविधा न पुरविण्याचा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नगरपंचायतीच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. 

कारवाई करणार ः  कोल्हे

जागा बिगरशेती करताना संबंधित अधिकार्‍यांकडून दिलेल्या नकाशांची शहानिशा करून ज्या जागामालकांनी मूळ नकाशाप्रमाणे रस्ते, सार्वजनिक सेवा-सुविधा याकरिता दाखविलेल्या जागा सोडल्या नाहीत व नियमाप्रमाणे नगरपंचायतीच्या ताब्यात दिलेल्या नाहीत अशा जागा मालकांवर संबंधित जागांची प्रत्यक्ष मोजणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुषमा कोल्हे यांनी दिली.

नकाशे बदलले.. रिकाम्या जागाही विकल्या

शहरामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षांत बिगरशेती झालेल्या जागांचे अनेक जागामालकांकडे वेगवेगळे नकाशे आहेत. त्यावर तहसीलदार, नगररचना विभागाचे अधिकारी यांचे शिक्के व सह्याही आहेत. हे पाहून अनेकांनी भूखंड खरेदी केले आहेत; परंतु नकाशात दर्शविलेल्या जागाही विक्री करण्यात आल्याचे उघड होत  आहे. तहसीलदार व नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांच्या सह्या व शिक्केही बोगस असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.