Sun, Sep 20, 2020 05:58होमपेज › Kolhapur › ...अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ

...अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ

Last Updated: Aug 12 2020 1:14AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

तुम्ही कोल्हापूरकरांची सेवा केली आहे, तोच आदर्श अन्य जिल्ह्यांसाठी यापुढे कायम ठेवा. कोरोना महामारीच्या काळात शासनाने कायदा केला आहे, त्याचे पालन करा, अन्यथा नाईलाजास्तव आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा शिवसेनेच्या वतीने मंगळवारी देण्यात आला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांची जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली. यावेळी रुग्ण नाकारू नका, त्यांच्यावर प्रथम उपचार करा. त्यांना योजनेचा लाभ द्या, अवास्तव बिल आकारणी करू नका; अन्यथा मी स्वत: गुन्हा दाखल करेन, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही दिला.

शिवसेना जिल्हाप्रमुख आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार म्हणाले, कोरोनाच्या या आपत्तीकाळात सर्वांनीच चांगले काम केले आहे. मात्र, काही ठिकाणी रुग्ण दाखल न करून घेणे, प्रारंभी पैशांची मागणी करणे, अवास्तव बिल आकारणी करणे असे प्रकार होत आहेत. तुम्ही कायदा पाळणार नसाल तर आम्हाला तो हातात घ्यावा लागेल.

जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, कोल्हापूरकारांसाठी आजपर्यंत तुम्ही जो सेवाभाव जपला, तो यापुढेही कायम राहू दे. त्यातून सर्वांसाठी आदर्श निर्माण होऊ दे. काहीजण शासनाचा आदेश धुडकावून संधीचा फायदा घेत आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यांनी विनाउपचार मरायचे का?

ज्या रुग्णालयात योजनेचा लाभ रुग्णांना दिला जात नाही त्यांच्यावर कारवाई करा, भरमसाट पैसे घेणार्‍यांवर गुन्हे दाखल करा.रुग्णालयात नेमलेल्या ऑडिटरने प्रत्येक बिलावर सही, शिक्‍का द्यावा नंतरच ते बिल रुग्णांनी भरावे, त्याच रुग्णालयातील औषधे खरेदीची सक्‍ती करू नये, शासनाचे आदेश, नियम तसेच दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात ठळक लावावे, जादा पैसे आकारले आहेत, ते तपासून परत द्यावेत आदी मागण्या  करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले,  महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेल्या रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना दाखल करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा. दाखल करून घेण्यास अथवा त्यांच्यावर उपचार करण्यास हलगर्जीपणा करू नये. जादा बिले आकारल्यास त्याची पडताळणी केली जाईल. त्यात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई केली जाईल. प्रसंगी योजनेतून काढून टाकून त्यांची नोंदणी रद्द करू.

कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी शासनाने खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आरक्षित केले आहेत. रुग्णास प्रथम उपचार करण्यास  रुग्णालयांनी प्राधान्य  द्यावे.  चालढकल करून रुग्ण दाखल करून घेणार नाहीत अशा रुग्णालमध्ये या योजनेतून सुरू असलेले अन्य लाभ बंद करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.

महापालिका आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी म्हणाले, खासगी रुग्णालयांनी सामाजिक बांधिलकीतून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास पुढे यावे. कोरोना काळात प्रशासनास सहकार्य करून कोल्हापूरचा लौकिक निर्माण करा. खासगी रुग्णालयातील बेड उपलब्धता आणि बिल तपासणीसाठी महापालिकेमार्फत अधिकार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तसेच, ऑडिटरने बिलाची तपासणी केल्याशिवाय रुग्णास डिस्चार्ज दिला जाणार नाही.

यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, युवा सेनेचे मनजित माने, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे आदींसह शहरातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयाचे डॉक्टर, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 "