होमपेज › Kolhapur › ...अन्यथा शिक्षक सामूहिक आत्मदहन करणार

...अन्यथा शिक्षक सामूहिक आत्मदहन करणार

Published On: Aug 27 2019 1:49AM | Last Updated: Aug 27 2019 12:47AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

शंभर टक्के अनुदानाच्या मागणीसाठी विनाअनुदानित शाळांमधील हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी रणरणत्या उन्हात सोमवारी रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शासनाने प्रलंबित मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास शिक्षकदिनी (5 सप्टेंबर) शिक्षक कुटुंबांसह सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. 

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे 20 टक्के अनुदान प्राप्त शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे; अघोषित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना निधीसह घोषित करावे; सर्व शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी 5 ऑगस्टपासून राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांसमोर बेमुदत धरणे आंदोलन, आमरण उपोषण सुरू आहे. 22 दिवस होऊनही शासनाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

दसरा चौक येथून ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात ‘शासन तुपाशी, आमचे शिक्षक उपाशी’, ‘पुरे झाले 20 टक्के, आता हवे 100 टक्के’ आदी फलकांद्वारे विद्यार्थ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ‘कोण म्हणतंय देत नाही, शंभर टक्के घेतल्याशिवाय राहणार नाही’, असे लिहिलेल्या पांढर्‍या टोप्या घालून शिक्षक सहभागी झाले होते. हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक रस्त्यावर आंदोलनासाठी उतरल्याने दसरा चौक परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली. कोल्हापूर विभागातील सुमारे 450 शाळांमधील पाच हजार विद्यार्थी, पालक, शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी खंडेराव जगदाळे, भरत रसाळे, डी.एस.घुगरे, राजेंद्र कोरे, सुनिल कल्याणी, प्रकाश पाटील, गजानन काटकर आदी उपस्थित होते. 

धडक मोर्चात महात्मा गांधी, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी यांची वेशभूषा परिधान करून सहभागी झालेल्या पराग पाटील, करिना यादव, पल्‍लवी वरक, श्रावणी काळे, बबन बंडगर यांनी विद्यार्थांनी लक्ष वेधून घेतले. सहयाद्री विद्यानिकेतनचे शिक्षक संतोष चव्हाण यांनी ’कोण म्हणतय देत नाही’ असे रंगविलेला शर्ट परिधान करीत शासनाचा निषेध केला. 

विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळत नसल्याने शिक्षक आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या आत्महत्याचे पाप शासन डोक्यावर घेऊन फिरत आहे, ही दुर्देवी गोष्ट आहे. शिक्षक पडेल ते काम करून उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना वेतन मिळणे हा त्यांचा हक्‍क आहे.
-करिना यादव, विद्यार्थिनी

विनाअनुदानित शिक्षकांची काढलेल्या धडक मोर्चास खा. प्रा. संजय मंडलिक भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे. 20 टक्के पात्र विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देणे व अघोषित शाळा निधीसह घोषित करण्याबाबत मंगळवारी होणार्‍या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून तातडीने निर्णय घ्यावा. अनुदानात शाळांचा प्रश्न मार्गी लावावा, अशा मागणीचे पत्र शिवसेनेचे खा. प्रा. संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठविले आहे. 

प्रलंबित मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. शासनाकडे अद्याप दुर्लक्ष केले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर विनाअनुदानित शिक्षक भाजप सरकारला मतदार करणार नाहीत.
-खंडेराव जगदाळे, 
राज्य उपाध्यक्ष, विनाअनुदानित शाळा कृती समिती