पुणे : प्रतिनिधी
मध्य महाराष्ट्रातील पुणे व दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये दोन दिवस 60 ते 110 मिलिमीटर दरम्यान पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.
दक्षिण व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर वादळी वार्यासह जोरदार सरींची शक्यताही वर्तविली गेली आहे.
तेलंगणा ते केरळदरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडू ते दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. परिणामी मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी विजांच्या प्रचंड कडकडाटासह धो-धो पाऊस पडेल, असे नमूद करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर कोकण, घाटमाथ्यावर काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.