Wed, Apr 01, 2020 00:02होमपेज › Kolhapur › मुक्‍त शिक्षणाचा पर्याय

मुक्‍त शिक्षणाचा पर्याय

Published On: May 29 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 10:35PMआर्थिक परिस्थिती किंवा इतर काही कारणांमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले असेल, तर मुक्‍त शिक्षण संस्था कमी पैशात शिक्षण उपलब्ध करून देतात.आर्थिक परिस्थिती किंवा इतर काही कारणांमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले असेल, तर मुक्‍त शिक्षण संस्था कमी पैशात शिक्षण उपलब्ध करून देतात.आपल्याकडे गावांमध्ये अनेक लोकांना कोणत्याना कोणत्या अडचणींमुळे आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे शक्य होत नाही; पण मुक्‍त शिक्षण किंवा ओपन एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकता आणि चांगल्या करिअरची सुरुवात करू शकता. भारतात ओपन स्कूल किंवा मुक्‍त शिक्षणाकडे ओढा वाढतोय. कारण, महागाईच्या काळात शिक्षणात मागे राहूनही चालणार नाही. त्यामुळे ज्या लोकांचे शिक्षण आर्थिक कारणांनी किंवा इतर काही कारणांनी मागे पडले आहे किंवा अगदी लांब गावात राहात असल्याने माध्यमिक शिक्षण सुटले आहे, त्यांना मुक्‍त शिक्षण पद्धती ही वरदान ठरणार आहे. 

सर्वेक्षणातील निरीक्षण -

एका सर्वेक्षणानुसार भारतात शिक्षणात नोंदणीचे गुणोत्तर 12 टक्के आहे, तर विकसित देशांमध्ये हे गुणोत्तर 70 टक्के आहे. त्यामुळेच सरकारसह अनेक शिक्षणतज्ज्ञांच्या मते ग्रामीण भागात शिक्षण पोहोचवण्यासाठी आणि सर्वांना सुलभ शिक्षण देण्यासाठी शिक्षणाचे अजून एक माध्यम म्हणून ओपन एज्युकेशन किंवा मुक्‍त शिक्षणाचा विकास करण्यावर भर देत आहेत. मुक्‍त शिक्षणामुळे देशातील गावांमध्ये राहणार्‍या लाखो भारतीयांना परवडणार्‍या किमतीत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकते. 

मुक्‍त विद्यापाठे आहेत कार्यरत-

देशात राष्ट्रीय स्तरावरील काही मुक्‍त शिक्षण केंद्रे तसेच ग्रामीण मुक्‍त शिक्षण केंद्रे, राज्य ओपन स्कूल, जसे राजस्थान स्टेट ओपन स्कूल, छत्तीसगड राज्य ओपन स्कूल, हिमाचल प्रदेश ओपन स्कूल यासारखी मुक्‍त विद्यापाठे आहेत, जे ग्रामीण आणि गरजवंत लोकांपर्यंत माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षणाबरोबरच व्होकेशनल किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस चालवतात. त्यामुळे ज्या लोकांचे शिक्षण काही कारणाने अर्धवट राहिले आहे, त्यांच्यासाठी शिक्षणाचा एक स्रोत उपलब्ध होतो. आणि त्यांना चांगल्या शिक्षणामुळे चांगला रोजगार मिळण्यास मदत होते. या मुक्‍त विद्यालयांचा मुख्य उद्देश देशातील सर्वदूर पसरलेल्या विद्यार्थ्यांना स्वस्त शिक्षण उपलब्ध करून देणे हाच आहे. 

वैशिष्ट्ये -

ओपन स्कूल्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच की आर्थिकदृष्ट्या ज्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यांना कमी पैशाच शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. जे लोक नोकरीमुळे शिक्षण अर्धवट सोडतात, त्यांनाही ओपन स्कूलमधून आपल्या क्षेत्रातील घेताना व्होकेशनल कोर्स करून अधिक गुणवत्ता मिळवू शकतात. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या गरजेनुसार विषयांची निवड करू शकता. त्याअंतर्गत भाषा विषयाची निवडही करू शकता. 

वयोमर्यादा नाही-

ओपन स्कूलचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशाला वयोमर्यादेचे बंधन नाही. ओपन स्कूलमधून प्राथमिक शिक्षण, दहावी, बारावी त्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकता. सीबीएसई आणि उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषद आदींप्रमाणे राष्ट्रीय मुक्‍त विद्यालयदेखील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा घेतात. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे जगात सर्वात मोठे ओपन स्कूल आहे. 

अभ्यासक्रम -

ओपन बेसिक एज्युकेशनसेकेंडरी सर्ट़िफिकेट कोर्स

सीनियर सेकेंडरी सर्टिफिकेट कोर्सव्होकेशनल एज्युकेशन

अनेक पर्याय :

दहावी, बारावी याशिवाय, अनेक प्रकारचे व्होकेशनल कोर्सेस उपलब्ध आहेत. फॅशन डिझायनिंग, ब्युटी कल्चर, जेरियाट्रिक केअर, हेअर स्टायलिस्ट, फुटवेअर टेक्नॉलॉजी अँड लेदर गूडस् मेकिंग, ज्वेलरी डिझायनिंग, ट्रॅव्हल अँड टिकटिंग, इंटिरिअर डिझायनिंग, फायनान्स, अकाऊंटन्सी अँड ऑडिटिंग, इलेक्ट्रॉनिक इस्ट्रुमेंटस रिपअरिंग इत्यादी. त्याशिवाय इंजिनिअरिंग, पॅरा मेडिकल, मॅनेजमेंट, हॉटेल व्यवस्थापन, फायर अँड सेफ्टी, कॉम्प्युटर आणि आयटीशी निगडित 100 हून अधिक कोर्सेस आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी चांगले करिअर घडवू शकतात. 

तांत्रिक मदत -

गरजवंतांपर्यंत शिक्षण पोहोचण्यात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण घेता येते. विद्यार्थी कुठेही असो, कोणत्याही वेळी आपल्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेऊ शकतो. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकतात. लेख, ब्लॉग वाचू शकतात. समूह चर्चेत भाग घेऊ शकतात. तसेच भरपूर अभ्यास साहित्यातून विषयाचा अभ्यास करू शकतात. व्हर्च्युअल क्लास रूम्स, वाचनीय आणि संवादपूर्ण सामग्री, स्वाध्याय सामग्री, रेकॉर्डेड साहित्य आदींचा फायदा करून घेऊ शकतात. त्याव्यतिरिक्‍त विद्यार्थ्यांना स्वशिक्षणासाठीचे साहित्य दिले जाते.

प्रवेश प्रक्रिया -

माध्यमिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना 8 वी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर बारावीसाठी  मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास करणे आवश्यक आहे. माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असल्यास कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. ओपन स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईनही पर्याय आहेच किंवा केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरू शकता. व्यावसायिक कोर्सेससाठी सर्टिफिकेट मिळते.

मुक्‍त विद्यापीठ किंवा संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करावी लागते किंवा त्या केंद्रांवर जाऊनही प्रवेश घेता येऊ शकतो. व्होकेशनल कोर्सेससाठी संपूर्ण वर्ष प्रवेश सुरू राहतात. ओपन स्कूलमध्ये 100 हून अधिक अभ्यासक्रम आहेत, यामध्ये विद्यार्थी एक चांगले करिअर घडवू शकतात. भारतात शिक्षणाचे सकल नामांकन गुणोत्तर 12 टक्के आहे. तर विकसित देशात हेच प्रमाण 70 टक्के आहे.

जगदीश काळे