Mon, Jul 06, 2020 23:41होमपेज › Kolhapur › प्रदेशाध्यक्षांसमोरच भाजप पदाधिकार्‍यांची खदखद उघड

प्रदेशाध्यक्षांसमोरच भाजप पदाधिकार्‍यांची खदखद उघड

Published On: Jan 16 2019 1:37AM | Last Updated: Jan 16 2019 1:13AM
कोल्हापूर : सुनील सकटे

शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या शहरातील पदाधिकार्‍यांनी गेल्या तीन वर्षांतील खदखद सोमवारी प्रदेशाध्यक्षांसमोरच व्यक्‍त केली. महानगर जिल्हाध्यक्ष बदला; अन्यथा आम्हाला मार्ग मोकळा आहे, अशा शब्दात मंडल अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रमुख पदाधिकार्‍यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पालकमंत्री, स्थानिक पदाधिकार्‍यांसह प्रदेश पदाधिकारीही अवाक् झाले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला.  दानवे यांच्यासमोर शहरातील पदाधिकार्‍यांना आपल्या कामाची माहिती देता आली नाही. त्यामुळे संतप्‍त दानवे यांनी ‘आता बसा’  असा आदेश दिला. या बैठकीनंतर शहरातील मंडल अध्यक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन पक्षाचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक यांची विशाळगड या कक्षात भेट  घेतली. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते मकरंद देेशपांडे, रवी अनासपुरे उपस्थित होते. या सर्व नेत्यांसमोरच मंडल अध्यक्षांनी संतप्‍त भावना व्यक्‍त करीत दानवे यांना आताच्या आता बोलवा; अन्यथा आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा घेतला. पुराणिक यांनी पदाधिकार्‍यांची समजूत काढत आपला शिस्तीचा पक्ष आहे. असे करू नका, अशा शब्दात समजावण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, आम्ही शिस्त पाळत आहोत. म्हणूनच सभागृहात गप्प राहून आपल्या कक्षात भूमिका मांडत आहोत, असे सांगितले. अखेर दानवे यांना सभागृहातून थेट विशाळगड कक्षात यावे लागले. 

दानवे यांचे विशाळगड कक्षात आगमन होताच मंडल अध्यक्ष पुन्हा आक्रमक बनले. आमच्यावर सतत अन्याय होत आहे. पक्षाचा कार्यक्रम करूनही कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली जात नाही. पालकमंत्र्यांना भेटू दिले जात नाही. राजीनाम्याची भाषा वापरली जाते. पक्षाची शिस्त म्हणून आम्ही आतापर्यंत सहन करीत आलो.

पण आता सहन होत नाही. एकतर आम्ही राजीनामे देतो; अन्यथा महानगर जिल्हाध्यक्ष तरी बदला अशी मागणी केली. सुमारे वीस मिनिटे स्वत: दानवे यांनी पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. 

दानवेंकडून शहराध्यक्षांची कानउघाडणी

पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकल्यानंतर दानवे यांनी शहर अध्यक्षांना स्वत:च्या गाडीतून सांगलीला येण्याची सूचना केली. यावेळी दानवे यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंडल अध्यक्षांना भेटून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्‍यांमध्ये खदखद उघड झाल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहे.