Wed, Jul 08, 2020 03:34होमपेज › Kolhapur › फेडरेशनकडून केवळ सेंद्रिय गुळाची खरेदी

फेडरेशनकडून केवळ सेंद्रिय गुळाची खरेदी

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:45PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

विविध अडचणींमुळे जगप्रसिद्ध कोल्हापुरी गूळ उद्योग अडचणीतून वाटचाल करत आहे. हा व्यवसाय टिकवण्यासाठी गूळ उत्पादक शेतकर्‍यांना आधाराची गरज आहे आणि तो आधार शासनाने मार्केटिंग फेडरेशनमार्फत गूळ खरेदी करून द्यावा, अशी माफक अपेक्षा शेतकर्‍यांची आहे; पण मार्ग काढत मार्केटिंग फेडरेशनमार्फत फक्‍त एक टक्‍का उत्पादन होणार्‍या सेंद्रिय गुळाची खरेदी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. 

सेंद्रिय गूळ खरेदीचा निर्णय दिलासा देणारा असला, तरी रासायनिक घटकांचा वापर करून गूळ उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय करणारा ठरत आहे. याबाबत गूळ उत्पादक शेतकर्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. 

राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शेेती उत्पादनांपैकी सेंद्रिय गूळ, बेडगी मिरची आणि मिरची पावडर खरेदी करण्यासाठी सहकारी संस्था, पणन संस्था, बचतगट यांच्याकडून अर्ज मागवले आहेत. सेंद्रिय गूळ उत्पादक शेतकर्‍यांसाठी हा निर्णय दिलासादायक आहे; पण ज्या गुळामुळे कोल्हापुरी गूळ म्हणून जगप्रसिद्ध झाला त्या रासायनिक गुळाबाबत शासन आखडते धोरण का घेत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. खरेतर गुळापासून शासनाला कोट्यवधींचा कर मिळत आहेत. आखाती देशांत गुळाला चांगली मागणी आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापुरातून सुमारे 4 लाख गूळ रव्यांची निर्यात करण्यात आली आहे. वर्षाला एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 25 ते 26 लाख गूळ रव्यांचे उत्पादन होत आहे. अशा परिस्थितीत गूळ उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज आहे. 

उत्पादन खर्च आणि मिळणारा दर यामुळे गूळ उत्पादन घेणे शेतकर्‍यांना परवडत नाही. यामुळे गुळाला हमीभाव द्यावा, मार्केटिंग फेडरेशनमार्फत शासनाने गूळ खरेदी करावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे गूळ उत्पादक शेतकरी करत आहेत. यासंदर्भात शेतकर्‍यांसमवेत शासन पातळीवर अनेकवेळा बैठका झाल्या; पण त्यापुढे काहीच चर्चा झाली नाही; पण गुळाला हमीभाव मात्र मिळू शकला नाही आणि हंगाम सुरू झाल्यावर गुळाचे दर कोसळण्याचे काही थांबले नाही. यामुळे गुर्‍हाळमालक आणि गूळ उत्पादक शेतकरी गूळ उत्पादनाकडेे दुर्लक्ष करू लागले आहेत. त्यामुळे गेल्या हंगामात जिल्ह्यात 1,250 गुर्‍हाळघरांपैकी कशीबशी चारशे गुर्‍हाळघरे सुरू झाली होती. त्यामुळे हा उद्योग टिकवण्यासाठी शासनाने सेंद्रिय गुळाबरोबर रासायनिक गूळ खरेदी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शेतकर्‍यांमधून व्यक्‍त होत आहे..

कोल्हापुरी गुळाच्या भरारीला खरेदीचा हात द्या

येथील मातीतील गुणांमुळे कोल्हापुरी गूळ जगात भरारी घेऊ शकला आहे. या गुळाचा लौकिक असाच वाढवावयाचा असेल, तर शासनाने मार्केटिंग फेडरेशनमार्फत रासायनिक गूळ खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी व्यक्‍त केली.