Fri, Feb 28, 2020 22:58होमपेज › Kolhapur › देशी दारू दुकानातून आता केवळ पार्सल?

देशी दारू दुकानातून आता केवळ पार्सल?

Published On: Apr 22 2018 1:16AM | Last Updated: Apr 21 2018 11:23PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

देशी दारू दुकानात आता दारू पिता येणार नाही. त्याचबरोबर 90 मि.लि.च्या बाटलीतून होणार्‍या मद्य विक्रीऐवजी आता 30 मि.लि व 60 मि.लि.च्या पॅकबंद बाटलीतून मद्य विक्री निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्कच्या विचाराधीन आहे. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मद्यपी, विक्रेते यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत. दुकानात मद्य पिण्यास बंदी आणल्यास ‘ओपन बार’ संकल्पनेला बरकत येणार आहे, याशिवाय रिकाम्या बाटल्यांमुळे प्रदूषणाचा प्रश्‍न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकण्याचा प्रकार वाढणार आहे. सध्या विदेशी दारू 90 मि.लि.पासून 750 मि.लि.पर्यंत पॅकबंद बाटलीतून मिळते. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार दारू दुकानदार किरकोळ स्वरूपात 30 व 60 मि.लि.च्या मापातून दारू देतात, याशिवाय शासनाच्या नियमानुसार मद्यपींना बसण्यासाठी खुर्ची, टेबल आणि खाण्यासाठी पदार्थ उपलब्ध करून दिले जातात; पण उत्पादन शुल्क खात्याने दारू दुकानात किरकोळ दारू विक्रीच बंद करून पॅकबंद बाटलीचे पार्सल घेऊन जाण्यास परवानगी देण्याचा विचार सुरू केला आहे. यासंदर्भात खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी जिल्हा पातळीवरील कार्यालयांना सूचना दिल्या असून, त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू केली आहे. 

नव्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास देशी दारू 30, 60, 90 मि.लि.मध्ये पॅकबंद मिळणार आहे. यामुळे सामाजिक सुरक्षितताही धोक्यात येणार आहे. कोण, कुठेही दारू पिण्याची शक्यता आहे. त्यातून ‘ओपन बार’ची संख्या वाढणार आहे. शाळा, खुली मैदाने, सार्वजनिक ठिकाणे सुरक्षित राहणार नाहीत. बहुतांश मद्यपी दारू प्यायल्यानंतर बाटल्या फोडतात. त्यामुळे अस्वच्छता आणि शारीरिक इजाही होण्याची शक्यता आहे. आजही शहरातील उद्याने, खुल्या मैदानांच्या कोपर्‍या-कोपर्‍यांवर दारूच्या बाटल्यांचे ढीग पाहावयास मिळतात. उपनगरांतील रस्त्याकडेलाही दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. उत्पादन शुल्कचा पार्सलचा निर्णय अंतिम झाल्यास त्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत 
नाही. 

प्रदूषणात पडणार भर

शहरात दररोज 180 टन कचरा जमा होतो. त्यातील सरासरी 10 टक्के कचरा प्लास्टिकच्या आणि काचेच्या बाटल्यांचा असतो. या बाटल्यांमध्ये मद्याच्या बाटल्यांचे प्रमाण अधिक आहे. आता 30 आणि 60 मि.लि. देशी दारू बाटलीतून मिळणार असल्याने त्यात आणखी भर पडणार आहे.   

Tags : Kolhapur, parcel, country, liquor, shops