Mon, Jan 18, 2021 10:44



होमपेज › Kolhapur › ऑनलाईन सातबारा नव्या वर्षातच

ऑनलाईन सातबारा नव्या वर्षातच

Published On: Nov 05 2018 1:24AM | Last Updated: Nov 05 2018 12:15AM



कोल्हापूर : अनिल देशमुख

ऑनलाईन सातबारा हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने त्याच्या प्रारंभासाठी गेल्या दोन वर्षांपासून मुहूर्त शोधला जात आहे. मात्र, सातबारा ऑनलाईन प्रक्रियेत येत असलेल्या त्रुटी पाहता शेतकर्‍यांच्या हातात ऑनलाईन मिळणार्‍या सातबार्‍यासाठी पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल, अशीच परिस्थिती आहे.

ऑनलाईन सातबार्‍याचे काम वेगाने व्हावे याकरिता दरवेळी नवनवी डेडलाईन देण्यात आली. या कालावधीत काम पूर्ण करण्यासाठी तलाठ्यांना आणि अधिकार्‍यांना अक्षरश: वेठीस धरण्यात आले. पहाटेपासून ते अगदी मध्यरात्रीपर्यंत, काहींनी तर रात्रभर जागून ऑनलाईनचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

कामाचे तास, कुटुंब, आरोग्य याचा कोणताही विचार न करता तलाठ्यांनी ऑनलाईन सातबार्‍यासाठी रात्रीचाही दिवस केला. यामध्ये महिला तलाठीही मागे राहिल्या नाहीत, लहान मुलांना घेऊन, अनेक महिला तलाठ्यांनी रात्रभर ‘एनआयसी’त बसून ऑनलाईन सातबाराचे काम पूर्ण केले. 

सातबार्‍याचे काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून काही ठिकाणी तलाठ्यांना वेळापत्रकही तयार करून देण्यात आले. त्यात चहा कधी घ्यायचा, किती वेळात घ्यायचा, किती वेळात जेवण करायचे, आलेल्या खातेदार, नागरिकांना कधी आणि किती वेळ भेटायचे, त्यांचे काम कधी करायचे, त्यासाठी रजिस्टर ठेवायचे, त्यात नोंदी करायच्या, वेळापत्रक कोणी चुकवले तर त्याला आर्थिक दंडही वसूल करण्यापर्यंत विविध प्रकार घडले. देखरेख ठेवण्यासाठी अधिकार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्या. काहींनी तर तलाठी बाहेर जाऊ नयेत म्हणून काम करत असलेल्या खोलींना अनेकदा आतून तर अनेकदा बाहेरून कड्या लावून तलाठ्यांना कोंडून ठेवण्याचेही उद्योग केले. 

हे सर्व प्रकार केवळ आणि केवळ राज्य शासनाने ऑनलाईन सातबारा सुरू करण्यासाठी दिलेल्या तारखा पाळण्यासाठी करण्यात येत आहेत. वरिष्ठांच्या आदेशापुढे स्थानिक अधिकारीही हतबल आहेत. समोर वास्तव दिसत असतानाही जशी सूचना येईल, त्यानुसार त्या वेळेत ऑनलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी तलाठ्यांच्या मागे चाबुक घेतल्यासारखे काही अधिकारी लागले आहेत.

या प्रकारात काही तलाठी आजारी पडले, काहींनी मधुमेह, रक्‍तदाब, मूळव्याध आदी व्याधींनाही आमंत्रण दिले. ऑनलाईन प्रक्रियेत या सर्व बाबींकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आता तलाठ्यांना भोगावे लागत आहेत.

सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही सातबारा ऑनलाईनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामात येणार्‍या अडचणींकडे राज्य शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे होते. मात्र, तलाठ्यांनाच हे काम करायचे नाही, असा समज करून शासनाने तलाठ्यांना येणार्‍या अडचणीकडे दुर्लक्ष केेले. त्याचा परिणाम म्हणून अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.

कधी मुख्यमंत्री, तर कधी महसूलमंत्र्यांनी ऑनलाईन सातबार्‍यासाठी तारखा दिल्या. आतापर्यंत सुमारे आठ वेळा ऑनलाईन सातबार्‍याचा मुहूर्त ठरवण्यात आला. मात्र, एकही मुहूर्त साधला गेला नाही. यावर्षी एक मे ही तारीख दिली  होती, ती पुढे गेली. यानंतर 31 जुलैची तारीख देण्यात आली ती ही पुढे गेली. आता अद्याप नवी तारीख देण्यात आलेली नाही. मात्र, ऑनलाईन सातबारा शेतकर्‍यांच्या हातात पडण्यास पुढचे वर्षच उजाडणार आहे, हे निश्‍चित!