Mon, Jan 18, 2021 09:59होमपेज › Kolhapur › एक होतं परडं... 

एक होतं परडं... 

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 11:30PMकोल्हापूर : विजय पाटील

मम्मा ‘परडं’ म्हणजे काय असतं? असा प्रश्‍न मुलानं विचारल्यावर जाणत्या पिढीसमोर भूतकाळातलं अख्खं भावविश्‍वच उभं राहतं. घरापाठीमागे असणार्‍या मोकळ्या जागेत चिमुकल्यांची मस्ती की पाठशाळा म्हणजे परडं. मातीत मनसोक्‍त खेळणं, लोळणं म्हणजे परडं. आईच्या मारापासून वाचण्यासाठी पेरूच्या झाडावर जाऊन लपणं म्हणजे परडं. बच्चेकंपनीची सुट्टीतली धम्माल दुनिया असणारं हे परडं संपलं. म्हणूनच आता एक होतं परडं? असंच मुलांच्या निरागस प्रश्‍नांना उत्तर म्हणून ऐन मे महिन्याच्या सुट्टीत आई-बापांना  सांगावं लागत आहे. 

प्रत्येक घरामागे जादा मोकळी जागा असायची. या मोकळ्या जागेत आंबा, पेरू, उंबर, शेवगा ही झाडं हमखास असत. देवघराला वाहणारी  जास्वंद, प्राजक्‍ता, सदाफुलीची छोटी झाडंही कडेला लावलेली दिसायची. बाकी सगळी जमीन पांढरी माती. चांदण्यारात्री वार्‍याला जेवण्याच्या सोयीसाठी मध्येच थोडीशी जमीन सारवलेली उठून दिसायची. शेजार्‍याला आपली हद्द समजावी म्हणून घराच्या दोन्ही बाजूला समांतर रचलेल्या मोडके-तोडके दगड-विटांची रांग उगीचच बोलकी वाटायची. असं सगळं निसर्गाचं कोंदण कमी-जास्त पद्धतीचं प्रत्येकाच्या  परड्याचं वैभव होतं. 

मुलांच्या सुट्टीत परडं ही मस्तीची पाठशाळा असे. सगळी बच्चेकंपनी भूक-तहान विसरून कडक उन्हात परड्यात खेळत. चिखलमातीच्या खेळात पोरांचे अंग मातीमय होणं हे नित्य होत. झाडावरील चिऊ-काऊला हातातल्या कणसाचे दाणे टाकण्यासाठी कुणाला आजच्यासारखे सांगायला लागायचे नाही. लपाछपी खेळताना माकडांसारखं सरसर झाडांवर चढण्यासाठी मग कसलं प्रशिक्षण घ्यावं लागायचं नाही. आताच्या भाषेत बीनपैशांचं खरखुरं शिकवणारं ते प्ले स्कूल म्हणायला हरकत नाही. मुलं परड्यात आहेत म्हटल्यावर घरची सगळी बिनधास्त राहायची. कारण परडं म्हणजे बच्चेमंडळींचं सुरक्षित ठिकाण हे मान्य केलेलं गृहितक होतं. मे महिन्याच्या सुट्टीत तांदळाचं पापड परड्यात उन्हात घालण्याचं काम मुलाचंच असायचं; पण हे पापड उन्हात वाळत घालणं कमी आणि चोरून मट्टदिशी खाणंच जास्त असायचं. परंड मुलांचा निसर्गाचा सन्मान करायला शिकवणारी शाळा म्हणा किंवा अनेक गोष्टी सहज शिकवणारा गुरू म्हणा. परडं तर मुलाचं भावविश्‍व होत. आता शहरच काय खेड्यातही परडं अडगळीचं वाटू लागलं. त्यामुळे परड्याच्या जागी अनेकांनी पत्र्याचे शेड बांधलीत. साहजिकच झाडं तुटली. त्यामुळं पाखरंही दूर गेली. काळ्या-पांढर्‍या मातीच्या जागी सिमेंटच्या आवरणाची जमीन आली. मग अंगाला लागणारी मातीही गुडूप झाली. 

मूळ रूपडं हरवलं...

आता काही ठिकाणी परड्याचे अवशेष शिल्‍लक पाहायला मिळतात; पण त्याचं मूळ रूपडं हरवलं आहे. हे परडं म्हणजे रोबोटला माणूस म्हणून बिलगल्यासारखं वाटणारं आहे. नव्या बदलांच्या घाईत मुलाचं भावविश्‍व असणारं परडं नष्टच झालं. परडं असतं तर मुलं छोटा भीम पाहण्यासाठी कदाचित तासन्तास टी.व्ही.समोर बसली नसती. किंवा मोबाईल गेमच्या जगात शिरली नसती असं राहून राहून जाणत्या पिढीला चुटपूट सध्या लागून राहिली आहे.