Sat, Feb 29, 2020 18:04होमपेज › Kolhapur › अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांना दीड लाखापर्यंत बक्षीस मिळणार

अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांना दीड लाखापर्यंत बक्षीस मिळणार

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 1:56AMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्याची भावना वाढीस लागावी, लोकांच्यात सकारात्मक दृष्टी तयार व्हावी, यासाठी अपघातातील जखमींना मदत करणार्‍यांना तसेच तातडीने रुग्णालयात घेऊन जाणार्‍या व्यक्ती व समुहासाठी गृह विभागाने 50 हजार ते दीड लाखापर्यंत बक्षीस देण्याची योजना मंजूर केली आहे. ही मदत संबंधितांना एक महिन्याच्या आत देण्याचेही शासनाचे नियोजन आहे. 

राज्यात दरवर्षी 13 ते 14 हजार लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात, तर 45 ते 46 हजारांपर्यंत लोक जखमी होतात. अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने वैद्यकीय मदत हवी असते. रात्री झालेल्या अपघातातील जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी लवकर मदत मिळत नाही. त्यामुळे अनेक गंभीर जखमींना प्राण गमावावे लागले आहेत. यामध्ये अनेकजण मदत करू इच्छित असतात, पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांचे झंजट मागे लागेल म्हणून अपघातग्रस्तांना मदत देण्यासाठी बहुतांश लोक पुढे येत नाहीत. जखमींना मदत करण्याची वृत्ती वाढावी, यासाठी शासनाने ही योजना हाती घेतली आहे. 

 जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी शासनाची आपत्कालीन रुग्णवाहिकेची सेवा सुरू आहे. सर्व शासकीय रुग्णालयांना अशा रुग्णवाहिका पुरविल्या आहेत. संपर्कासाठी 108 क्रमांकाची टेलिफोनची सुविधा आहे, पण अनेकवेळा ही सुविधा तातडीने उपलब्ध होत नाही. त्यामुळे जखमींवर लवकर उपचार होऊ शकत नाहीत. त्यामुळे शासनाने ही बक्षीस योजना सुरू केली आहे. मदत करणारी व्यक्ती, संस्था, समूह हे बक्षिसासाठी पात्र ठरू शकतात. गृह विभागाच्या रेसकोर्स निधीतून या बक्षिसाची रक्कम संबंधितांना देण्यात येणार आहे. यासाठी पहिले बक्षीस 1 लाख 50 हजार, दुसरे बक्षीस 1 लाख, तिसरे बक्षीस 50 हजार असे बक्षिसांचे स्वरूप आहे.

बक्षिसासाठी कोण पात्र ठरविणार
अपघातग्रस्तांना मदत केलेली व्यक्ती किंवा संस्था/समुह यांना शासनाने जाहीर केलेले बक्षीस मिळवून देण्यासंदर्भात पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस, जिल्हा पोलिस अधीक्षक, वाहतूक शाखेचे प्रमुख यांनी एक महिन्याच्या आत शासनाकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे, हा प्रस्ताव गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे जाणार असून समितीच्या मंजुरीनंतर हे बक्षीस संबंधीताना मिळणार आहे.