Tue, Mar 31, 2020 23:59होमपेज › Kolhapur › आता ‘बायोमेट्रिक’द्वारे रॉकेलही मिळणार

आता ‘बायोमेट्रिक’द्वारे रॉकेलही मिळणार

Published On: Jul 09 2018 1:18AM | Last Updated: Jul 09 2018 12:47AMकोल्हापूर : अनिल देशमुख

‘बायोमेट्रिक’ पद्धतीने ई-पॉस मशीनद्वारे आता रॉकेलही देण्यात येणार आहे. जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. यामुळे रेशनवरील रॉकेलच्या गैरव्यवहारालाही चाप लागणार आहे.

ई-पॉस मशीनद्वारे रेशनवरील धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली. रेशनिंगमध्ये कोल्हापूर पॅटर्न निर्माण करत योग्य आणि गरजूंपर्यंत वेळेवर धान्य पोहोचवण्याबरोबर गैरमार्गाने वितरित होणारे मोठ्या प्रमाणात धान्य वाचवण्यात आले. या योजनेमुळे राज्यात तर 3 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक धान्य शिल्लक राहिले, हे धान्य आता नवीन लोकांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटपाचा निर्णय यशस्वी झाल्याने आता या मशीनद्वारे रॉकेल वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाला आवश्यक तयारी करण्याच्या सूचना राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात धान्य व केरोसीन विक्रीचा परवाना असलेल्या दुकानदारांना यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. यानंतर केवळ केरोसीन विक्रीचा परवाना असलेल्या दुकानदारांना ई-पॉस मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जिल्ह्यात सध्या कोल्हापूर शहर हे रॉकेलमुक्त करण्यात आले आहे. इचलकरंजी शहरही रॉकेलमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इचलकरंजीत केवळ एका टँकरद्वारे 12 हजार लिटर रॉकेलचे महिन्यासाठी वितरण केले जाते. तेही लवकरच बंद केले जाणार आहे. या दोन शहराव्यतिरिक्त जिल्ह्यात दर महिन्याला सुमारे 7 लाख 32 हजार लिटर रॉकेलचे वितरण केले जाते.

ई-पॉसद्वारे रॉकेल वितरित केल्यास दर महिना किमान एक लाख लिटर रॉकेलची बचत होईल, अशी शक्यता आहे. जिल्ह्यातील 9 लाख 58 हजार 722 कार्डधारकांपैकी आता केवळ 2 लाख 7 हजार 250 कार्डधारक रॉकेलसाठी पात्र आहेत. यापैकी 13 हजार 795  कार्डधारकांना दोन लिटर, 22 हजार 598 कार्डधारकांना 3 लिटर, तर 1 लाख 70 हजार 857 कार्डधारकांना प्रत्येकी 4 लिटर रॉकेलचे वितरण केले जाते. आता यातील गरजूंनाच यापुढे रॉकेल मिळणार आहे.