Fri, Jul 10, 2020 01:36होमपेज › Kolhapur › आता रेशनवर मिळणार ‘मका’

आता रेशनवर मिळणार ‘मका’

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:46PMकोल्हापूर : अनिल देशमुख

रेशनवर आता मका दिला जाणार आहे. एक किलो रुपये दराने या मक्याचे वितरण केले जाणार आहे. जुलैपासून प्रत्यक्ष वितरण होणार असून याकरिता 10 हजार क्‍विंटल मका जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. विक्रीपेक्षा वाहतूक खर्च अधिक होणार असल्याने हा मका शहरानजीकच्या सहा तालुक्यातच वितरित केला जाणार आहे.राज्य शासनाने खरेदी केलेला मका मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे. हा मका तूरडाळीप्रमाणेच रेशनवरून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार अवघ्या एक रुपये किलो दराने हा मका वितरित केला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून कोल्हापूरसह पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यासाठी मका देण्यात आला आहे.

सहा तालुक्यातील अन्‍न सुरक्षा योजनेतील ‘प्राधान्य कुटुंबांना’ हा मका देण्यात येणार आहे. त्याकरिता त्यांना देण्यात येणार्‍या तीन किलो गहू कमी करण्यात येणार आहेत. या कुटुंबाना दोन किलो गहू आणि एक किलो मका देण्यात येणार आहे. सहा तालुक्यांतील मागणी घेण्यात आली आहे, त्यानुसार नियोजन सुरू असून, जुलै महिन्यापासून वाटपाची तयारी करण्यात आली आहे.

‘पस्तीशी’च्या तुरडाळीची प्रतिक्षा

मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेली तूर खपवण्यासाठी राज्य शासनाने तिचा दर ‘पस्तीस’ रुपयापर्यंत कमी केला आहे. त्यातील चार रुपये दुकानदारांना कमिशन देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 55 रुपये किलो तुरडाळीप्रमाणेच कोणत्याही रेशनकार्ड धारकांना ही स्वस्तातील तूरडाळ देण्यात येणार आहे. मात्र, ही स्वस्त तुरडाळ अद्याप जिल्ह्यात आलेली नाही. राज्य शासनाने याबाबतचे पत्र अद्याप जिल्हा प्रशासनाला पाठवलेेले नाही. हे पत्र आल्यानंतरच दुकानदारांकडून मागणी घेण्यात येईल आणि त्यानूसार तुरडाळीची मागणी करण्यात येईल असे जिल्हा पुरवठा कार्यालयातून सांगण्यात आले.