Wed, Jan 20, 2021 00:26होमपेज › Kolhapur › काँग्रेसला मिळेना तुल्यबळ उमेदवार

काँग्रेसला मिळेना तुल्यबळ उमेदवार

Published On: Sep 24 2019 1:38AM | Last Updated: Sep 23 2019 11:17PM
कोल्हापूर : सतीश सरीकर
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्‍ला. साहजिकच, या मतदारसंघातून उमेदवारीसाठी शिवसेनेत रस्सीखेच असते. आमदार राजेश क्षीरसागर गेली दहा वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. परिणामी, त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मातब्बर उमेदवाराची वानवा आहे. आर्थिकद‍ृष्ट्या सक्षम व तुल्यबळ उमेदवारासाठी काँग्रेसकडून काहीजणांना अक्षरशः पायघड्या घातल्या जात असल्याचे वास्तव आहे.

गेल्यावेळी काँग्रेसकडून लढलेले सत्यजित कदम यंदा ताराराणी आघाडी किंवा अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. कारण, कदम हे महाडिक यांचे नातेवाईक असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील व महाडिक यांच्यात हाडवैराचे राजकारण आहे. त्यामुळे काँग्रेसकडून ते लढणार नाहीत किंवा सतेज पाटील त्यांना उमेदवारी मिळू देणार नाहीत, हे स्पष्ट आहे. शिवसेना-भाजप युती झाली नाही तर भाजपमधून उमेदवारीसाठी कदम प्रयत्नशील आहेत. परंतु, भाजपचे गेल्यावेळचे उमेदवार महेश जाधव हे त्यांना उमेदवारीसाठी स्पर्धक असतील. युती न झाल्यास दोघांपैकी उमेदवारी कोणाला द्यायची? यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर यक्षप्रश्‍न असणार आहे. युतीवरच जाधव यांची उमेदवारी अवलंबून आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झालीच आहे. शिवसेना-भाजप युतीवर अद्याप शिक्‍कामोर्तब व्हायचे आहे. सद्यस्थितीत युती होईल, अशी चर्चा आहे. शिवसेना उमेदवार म्हणजे विजय असे समीकरण गेल्या काही वर्षांत बनले आहे. त्यामुळे शिवसेनेतून क्षीरसागर यांच्याबरोबरच जिल्हा प्रमुख संजय पवार कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास इच्छुक आहेत. क्षीरसागर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. काँग्रेसमधून जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी लढण्याची तयारी केली होती. परंतू ऐनवेळी सतेज पाटील यांच्याऐवजी आता ऋतुराज यांना कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आ. अमल महाडीक यांच्याशी सामना करावा लागणार आहे. परिणामी काँग्रेसकडे कोल्हापूर उत्तरमध्ये सक्षम उमेदवार नाही.

माजी आ. मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांच्यासाठी त्यांचे समर्थक प्रयत्नशिल आहेत. काँग्रेस किंवा किंबहूना अपक्ष म्हणून रिंगणात उतरावे यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यांच्या समर्थकांचा नुकताच मेळावाही झाला आहे. त्यानंतर आ. क्षीरसागर व माजी. आ. मालोजीराजे यांच्या समर्थकांत सोशल वॉर सुरू झाले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार म्हणून काँग्रेसकडून आणखी काही नावांचा विचार सुरू आहे. परंतू निष्ठावंताना डावलून नव्यानेच पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यास प्रसंगी काँग्रेस सोडण्याचा इशारा एका गटाने दिला आहे. काँग्रेसकडून माजी महापौर सागर चव्हाण व माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण लढण्यास इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही रिंगणात असण्याची शक्यता आहे. या पक्षाची ताकद म्हणावी तितकी शहरात नाही हेही वास्तव आहे. मात्र कुणाच्या तरी पराभवाला ते कारणीभूत ठरू शकतात, अशी चर्चा आहे. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक हेही निवडणूक लढविणार आहेत.  

अपवाद वगळता शिवसेनेचेच वर्चस्व

कोल्हापूर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्‍ला आहे. 1990 पासून या ठिकाणी अपवाद वगळता शिवसेनेचाच भगवा फडकत आहे. तत्कालीन आमदार सुरेश साळोखे यांचा पराभव करून काँग्रेसच्या मालोजीराजे यांनी शिवसेनेची विजयाची परंपरा खंडित केली होती. मात्र, 2009 मध्ये राजेश क्षीरसागर यांनी विजय मिळवून पुन्हा शिवसेनेकडे हा मतदारसंघ खेचून घेतला. त्यानंतर 2014 ला काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना-भाजप असे चारही पक्ष स्वतंत्ररीत्या लढले. त्यात क्षीरसागर यांनी विजय मिळविला.