Fri, May 07, 2021 19:19
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून नऊ दिवस जनता कर्फ्यू!

Last Updated: May 04 2021 9:31PM

कोल्हापूर:पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवार दि.5 पासून दि.13 पर्यंत नऊ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद द्यावा,असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात दिनांक १४ एप्रिल पासून संचार बंदी लागू आहे. त्यामध्ये नागरिकांना योग्य कारण असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास प्रतिबंध केलेला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांच्या हालचाली योग्य कारणाशिवाय सुरु राहील्यास कोरोना रुग्णात वाढ होवून त्याचा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना अनावश्यकरित्या त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत प्रतिबंधात्मक आदेशाची कडक अंमलबजावणी करणे बाबत निरिक्षणे नोंदवली आहेत.

यासर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी बैठक झाली. पालकमंत्री पाटील, मंत्री मुश्रीफ आणि राज्यमंत्री यड्रावकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत जिल्ह्यात कडक लॉकडॉन करण्याबाबत चर्चा झाली. यानंतर जिल्ह्यात दि.५ रोजी सकाळी ११ वाजल्या पासून ते दि. १३ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (संचार बंदी) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, तातडीची वैद्यकीय गरज तसेच वैध कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे या कालावधीत वैद्यकीय सुविधा व सेवा पूर्ण वेळ सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी आदी दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उघडी राहतील. मात्र, नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी. अत्यावश्यक बाब नसेल तर अत्यावश्यक वस्तु खरेदीसाठी घराबाहेर पडू नये. हॉटेल्स, रेस्टॉरंटस यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या कालावधीत अत्यावश्यक, निर्यात व निरंतर प्रक्रिया उद्योग अस्थापना यापूर्वी दिलेल्या नियंत्रणास बांधील असतील. तसेच शेती व शेतीशी निगडीत त्याचप्रमाणे मान्सून पूर्व करावयाची सर्व कामे सुरु राहतील असेही सांगण्यात आले.

जनता कर्फ्यू कालावधीत पूर्वीप्रमाणेच सकाळी 7 ते 11 यावेळेस किराणा दुकाने, बेकरी तसेच अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहे. मात्र, नागरिकांनी या सर्व सेवा घरपोच मागवाव्यात,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.