होमपेज › Kolhapur › नवमतदारांची भूमिका निर्णायक!

नवमतदारांची भूमिका निर्णायक!

Last Updated: Oct 21 2019 1:50AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
विधानसभेच्या जिल्ह्यातील दहा मतदार संघांसाठी आज, सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 30 लाख 93 हजार 43 मतदार मतदान करणार असून, यापैकी 18 ते 19 वयोगटातील 73 हजार 257 मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.

प्रचंड चुरस, टोकाला गेलेली ईर्ष्या आणि तरुणांचा निवडणुकीतील वाढता सहभाग, यामुळे यंदा जिल्ह्याच्या प्रत्येक मतदार संघात काटाजोड लढती होत आहेत. यामुळे प्रत्येक मतदान महत्त्वाचे ठरणार असल्याने गठ्ठा मतदानासह एकेका मतासाठीही फिल्डिंग लावली आहे. तरुणांसह जिल्ह्यात 70 वर्षांवरील मतदारांचीही संख्या चांगली आहे. 80 वर्षांवरील तब्बल 98 हजार 491 मतदार आहेत. या सर्वांचे मतदान होईल, याद‍ृष्टीने उमेदवारांनी नियोजन केले आहे. गावागावांत त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. मतदारांसाठी वाहनांचेही नियोजन करण्यात आले आहे. बाहेरगावी असणार्‍या मतदारांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यात तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी सुमारे 42.37 टक्के म्हणजेच 13 लाख 9 हजार 577 मतदार हे 40 वर्षांखालील आहेत. यामुळे जिल्ह्यातील विजयाच्या चित्रात तरुणांचा वाटा मोठा राहणार आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 40 वर्षांपर्यंतचे सर्वाधिक तरुण मतदार आहेत. याच वयोगटातील सर्वात कमी मतदार कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आहेत. 40 ते 49 या वयोगटातही जिल्ह्यात 6 लाख 28 हजार 680 मतदार आहेत. जिल्ह्यात 40 वर्षांखालील सर्वाधिक मतदार कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 18 ते 19 या वयोगटातील आणि विधानसभेसाठी प्रथमच मतदान करणार्‍यांची संख्या 8 हजार 199 इतकी आहे. तर या मतदारसंघात 18 ते 40 या वयोगटातील मतदार 1 लाख 40 हजार874 आहेत. याउलट कोल्हापूर उत्तर मतदारसंघात याच वयोगटातील सर्वात कमी म्हणजे 1 लाख 13 हजार 782 मतदार आहेत. राधानगरीत सर्वाधिक पुरुष, तर कागलमध्ये सर्वाधिक महिला मतदार जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची नोंद आहे. या मतदारसंघात 3 लाख 25 हजार 671 मतदार आहेत. सर्वात कमी मतदार 2 लाख 86 हजार 169 कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आहेत. राधानगरीत 1 लाख 68 हजार 998 सर्वाधिक पुरुष, तर कागलमध्ये 1 लाख 60 हजार 84 इतक्या सर्वाधिक महिला मतदार आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये 1 लाख 43 हजार 176 इतके सर्वात कमी पुरुष मतदार, तर शाहूवाडीत 1 लाख 38 हजार 702 इतके सर्वात कमी महिला मतदार आहेत.

शंभरी ओलांडलेले हजारावर मतदार

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदारयादीनुसार जिल्ह्यात 99 वर्षांवरील तब्बल 1 हजार 567 मतदार आहेत. यापैकी सर्वाधिक 956 महिला मतदार आहेत. 611 पुरुष मतदार आहेत. शिरोळ मतदारसंघात यापैकी सर्वाधिक 306, तर कागलमध्ये सर्वात कमी 104 मतदार आहेत. दहा मतदारसंघांत एकूण 23 एनआरआय (अनिवासी भारतीय) मतदारांची नोंद आहे. यासह 81 इतर मतदारांची (तृतीयपंथीय) नोंद आहे. यातील सर्वाधिक मतदार इचलकरंजीतील (56) असून, राधानगरी व शिरोळ या मतदारसंघांत एकही इतर मतदार नाही. जिल्ह्यात एकूण 8 हजार 695 सर्व्हिस व्होटर (सैनिकी मतदार) आहेत. चंदगडमध्ये सर्वाधिक 2 हजार 235, तर कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वात कमी 95 मतदार आहेत.

24,197 दिव्यांग मतदार

जिल्ह्यात 24,197 दिव्यांग मतदारांची यादीत नोंद आहे. या मतदारांसाठी त्या त्या मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, ब—ेल लिपीतील मतपत्रिका, मतदार चिठ्ठ्या, मॅग्‍नेफाईंग ग्लास, मदतनीस, वाहन आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

मतदानासाठी 11 पुरावे 

मतदानाचा हक्‍क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन जावे तथापि ज्या मतदारांकडे मतदान ओळखपत्र नाही अथवा खराब झाले आहे, अस्पष्ट आहे, अशा व्यक्‍तींसाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले शासकीय, निमशासकीय, शासकीय महामंडळामधील कार्यरत कर्मचारी-अधिकारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे, पोस्टाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहींतर्गत देण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मनरेगांतर्गत दिलेले जॉब कार्ड, हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खासदार व आमदार यांना दिलेले शासकीय ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदारांना मतदान केंद्रांवर ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.