Fri, Jul 10, 2020 19:31होमपेज › Kolhapur › नथुराम गोडसे दहशतवादीच होता : अ‍ॅड. आंबेडकर

नथुराम गोडसे दहशतवादीच होता : अ‍ॅड. आंबेडकर

Published On: May 17 2019 9:25PM | Last Updated: May 17 2019 9:25PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करणारा नथुराम गोडसे दहशतवादीच आहे, हे कोणाला सिध्द करून पाहिजे असेल तर कोणत्याही चौकात या, असे खुले आव्हान वंचित बहुजन आघाडीचे संघटक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. 

कोल्हापुरात बहुजन वंचित आघाडी पदाधिकार्‍यांच्या महामेळाव्याला ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे हे देशभक्‍त होते असे वक्‍तव्य एका वाहिनीशी बोलताना केले. यावरून राजकीय पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. प्रज्ञासिंह यांच्या या  वक्‍तव्याचा समाचार घेताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोणत्याही व्यक्‍तीचा खून करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही. महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर गोडसे याची वेगळी प्रतिमा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला गेला. आजही तो होत आहे. पण गोडसे हा दशहतवादीच होता हे सिध्द करण्यासाठी कोणत्याही चौकात येवून बोलायला तयार आहे.

'कोणत्याही स्थितीत भाजपला पाठिंबा नाही'
 
लोकसभा निवडणूक निकालानंतर पंतप्रधान पदासाठी कोणाला पाठिंबा देणार असे विचारता अजून निकाल लागला नाही. २३ मे नंतरच कोणता निर्णय घ्यायचा हे ठरवू पण कोणत्याही स्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी सांगितले.  

विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडी आता कोणत्याही राजकीय पक्षाकडे युती करण्यासाठी जाणार नाही. पक्षाची ताकद वाढली आहे. लोकसभेसाठी जनता दल व एमआयएम बरोबर युती होती. विधानसभेसाठी हीच युती कायम राहणार व राज्यातील सर्व २८८ जागा लढवणार असेही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी हे एका खासगी कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले तेव्हा त्यांनीही नथुराम गोडसे हा दहशतवादीच आहे, त्याचा उदो उदो करण्याची गरज नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.