Mon, Sep 21, 2020 23:58होमपेज › Kolhapur › कोल्हापूरला खंडपीठ व्हावे : पवार

कोल्हापूरला खंडपीठ व्हावे : पवार

Last Updated: Feb 15 2020 1:51AM

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे या मागणीचे निवेदन शरद पवार यांना देताना खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे आणि इतर मान्यवरकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, अशीच आपली भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने पवार यांना निवेदन दिलेे. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे यासाठी गेली 35 वर्षे संघर्ष सुरू आहे. सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांच्या द‍ृष्टीने कोल्हापूरला खंडपीठ होणे सोयीचे आहे. सध्या मुंबई येथे असणारी उच्च न्यायालयाची इमारत कोर्ट कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे न्यायालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी 5 हजार 500 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे समजते. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यापेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे विकेंद्रीकरण करून कोल्हापूरला सर्किट बेंच तयार करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनात केली आहे.

मुंबईकरांचा कोल्हापूरबरोबरच पुण्यालाही विरोध

यावेळी पवार यांनी मुंबईकरांचा केवळ कोल्हापूरलाच नाही; तर पुण्यातही खंडपीठ होण्याला विरोध आहे. कोल्हापुरात खंडपीठ होणे सहा जिल्ह्यांसाठी सोयीचे आहे. त्यामुळे कोल्हापुरातच खंडपीठ व्हावे, अशी आपली भूमिका असल्याचे सांगितले.

या वेळी खंडपीठ समितीचे निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. जयेंद्र पाटील, अ‍ॅड. गुरुप्रसाद माळकर, अ‍ॅड. वैभव काळे, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस,  अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, शिष्टमंडळातील सदस्यांनी पवार यांना उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला व्हावे या मागणीसाठी गेली 35 वर्षे आंदोलन सुरू असल्याबाबतची माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच स्थापन करावे, असे पत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयास पाठविले आहे. दरम्यान, सध्याही आंदोलन सुरूच असून अलीकडेच खंडपीठाच्या मागणीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीच्या कामकाजापासून अलिप्‍त राहण्याचा निर्णय वकिलांनी घेतला. पक्षकारांनीही अनुपस्थित राहून या मागणीला पाठिंबा दिला.

ज्या सहा जिल्ह्यांतून खंडपीठाची मागणी केली जात आहे, त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारची आंदोलने याच मागणीसाठी करण्यात आली आहेत. खंडपीठ पूर्ण होईपर्यंत आंदोलन  टप्प्याटप्प्याने सुरू ठेवण्याचा निर्णय कृती समिती सदस्यांनी सांगितले.

पावणेदोन कोटी पक्षकारांना न्याय द्या

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील पावणेदोन कोटी पक्षकारांना कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास त्याचा  लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे मुंबईला जावे लागत असल्यामुळे त्या खर्चातही बचत होणार असल्याने याबाबतचा निर्णय तातडीने व्हावा आणि पक्षकारांना न्याय मिळावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

 "