Sat, Feb 29, 2020 12:01होमपेज › Kolhapur › जहाज बुडत असताना पहिल्यांदा उंदीर बाहेर पडतात : हसन मुश्रीफ 

जहाज बुडत असताना पहिल्यांदा उंदीर बाहेर पडतात : हसन मुश्रीफ 

Published On: Jul 27 2019 2:55PM | Last Updated: Jul 27 2019 2:55PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांनी पक्षांतर करत असलेल्या स्वपक्षीय आमदारांना खोचक टीका केली आहे. जहाज बुडत असताना पहिल्यांदा उंदिर बाहेर पडत असतात असे म्हणत त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांना टोला लगावला. 

आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानांसह सहा ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले होते. या छाप्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.  दिस जातील.. दिस येतील.. भोग सरल.. सुख येईल या गीता प्रमाणे निश्चित चांगले दिवस येतील असेही ते म्हणाले. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानासह सहा ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सकाळी एकाचवेळी छापे टाकले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज साखर कारखाना, कोल्हापूर येथील दोन्ही घरे, पुणे येथील फ्लॅट, कागल येथील जुने घर या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्याचे वृत समजताच जिल्ह्यात खळबळ उडाली.

आयकर विभागाच्या पुणे विभागातील बारा ते पंधरा अधिकार्‍यांचे पथक गुरुवारी नऊ ते दहा वाहनांतून सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आ. मुश्रीफ  यांच्या घरी धडकले. तत्पूर्वी, काही वेळापूर्वीच आ. मुश्रीफ मुंबईहून घरी परतले होते. सकाळी आ. मुश्रीफ यांनी विविध कामांनिमित्त आलेल्या लोकांची केबिनमध्ये भेट घेतली. आत जाऊन वृत्तपत्रे वाचत असताना पावणेआठच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानासमोर आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची वाहने दाखल झाली.

अधिकारी पटापट उतरले  त्यांनी निवासस्थानाची नाकेबंदी करून गेट बंद केले. कोल्हापूरहून आलेल्या पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला. कामासाठी आलेल्या लोकांनादेखील त्यांनी बाहेर सोडले नाही. आतील लोक आत आणि बाहेरील लोक बाहेर, अशी स्थिती निर्माण झाली. काही लोक वैद्यकीय कामासाठी आले होते. मात्र, आता कोणीही भेटणार नाहीत, असे सांगून पोलिस त्यांना परत पाठवत होते.