Tue, Jun 15, 2021 11:30
राष्ट्रवादी स्थापना दिवस : सर्वसामान्य कार्यकर्ताच पक्षाच्या केंद्रस्थानी, कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे : हसन मुश्रीफ

Last Updated: Jun 10 2021 9:39AM

मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीच्या जोरावर झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून, त्या द़ृष्टीनेच आजपर्यंत पक्षाचे काम चालले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते. 

प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना अन् तुमची पक्षासोबतची वाटचाल कशी झाली?

उत्तर : आदरणीय पवारसाहेबांनी 10 जून 1999 रोजी काँग्रेस पक्षातून बाजूला जात राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्षा स्थापन केला.पवार साहेबांचं राजकारणातील वजन, वलय व मुरब्बीपणाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचा वेगाने विस्तार झाला. आदरणीय पवारसाहेबांचे नेतृत्व मानून मी त्याचवेळी त्यांच्यासोबत गेलो अन् याच साली मला विधानसभेची उमेदवारी मिळाली. या पहिल्या प्रयत्नात मी विधानसभेच्या सभागृहात दाखल झालो. पक्षस्थापनेसोबतच माझी विधानसभेतील वाटचाल राहिली आहे. 

2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक 71 जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला त्यावेळेपासून बनला असून आजतागायतपणे तो टिकून आहे. पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. केवळ राज्याच्या नव्हे, तर देशाच्या राजकारणातही राष्ट्रवादीला वेगळी अशी ओळख प्राप्त झाली आहे.

प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व आपले घनिष्ठ नाते याबद्दल काय सांगाल?

उत्तर : राष्ट्रवादी पक्षाची स्थापना ही सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी झाली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामान्य लोकांसाठी खर्ची घातले असून, मीही असाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. आदरणीय साहेबांनी मला आजवर दिलेली संधी व यामधून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू शकलेला सर्वांगीण विकास हा अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत फार मोठा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची असलेली भक्कम फळी हीच राष्ट्रवादीच्या आजवरच्या यशाचे गमक आहे.

प्रश्न : सध्या राष्ट्रवादीकडून तुमच्याकडे महत्त्वाच्या अशा ग्रामविकास खात्याची जबाबदारी असून, त्याबद्दल काय सांगाल?

उत्तर : ग्रामविकास खाते ग्रामीण विभागाशी निगडीत असून, या खात्यामध्ये काम करण्याची संधी मला पक्षाध्यक्ष पवारसाहेबांमुळे मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. ग्रामविकास खात्यामार्फत आजवर गेल्या दीड वर्षात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले असून, याचा फायदा सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात झाला आहे. राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा ही ग्रामीण भागाशी निगडीत असल्याने माझ्या खात्याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्यास यामुळे मदत मिळाली आहे.

प्रश्न : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी पक्षाची ताकद अन्य कोणत्याही पक्षापेक्षा वरचढ आहे, याबद्दल काय सांगाल?

उत्तर : आदरणीय शरद पवार साहेबांचे कोल्हापूरशी ॠणानुबंध वेगळे आहेत. कोल्हापूरच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल पवार साहेबांना मोठी आस्था असते. त्या प्रश्नाची निर्गत करण्यासाठी ते सातत्याने धडपडत असतात. त्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादीची एक वेगळी अशी ताकद तयार झाली आहे. या ताकदीच्या जोरावरच ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आम्ही विजयी होऊ शकलो.

सहकारात राष्ट्रवादीचे जाळे हे संपूर्ण महाराष्ट्रात भक्कम असून, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सहकारातील योगदान वाखाणण्यासारखे आहे. यामुळे सहकारातही राष्ट्रवादी वरचढ असल्याचे दिसून येत आहे. ही सर्व किमया आदरणीय पवार साहेबांची असून, त्यांना ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची नावानिशी असणारी ओळखही कारणीभूत आहे.

प्रश्न : गेल्यावेळी भाजपची सत्ता राज्यात असताना कोल्हापूर जिल्ह्यात भाजपकडून सर्वाधिक त्रास तुम्हाला दिला गेल्याच्या चर्चा अधिक आहेत. ‘पवार एके पवार’असल्याचाही त्यावेळी तुम्हाला त्रास झाला. नेमके काय होते?

उत्तर : मागील टर्ममध्ये भाजप सत्तेत आली. तत्कालीन परिस्थितीत राज्याचे दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर भाजपमय करायचा होता. यासाठी त्यांनी सर्वप्रकारच्या जोडण्या लावल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद ही मोठी असल्याने या ताकदीला छेद देण्यासाठी त्यांनी मलाही भाजपचे निमंत्रण दिले होते. खुल्या कार्यक्रमात त्यांना ‘मी पवार एके पवार आहे’ हे स्पष्ट केले होते. यातूनच विविध प्रकारचे छापे टाकून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या काळात पक्षाध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते व जनता माझ्या सोबत राहिल्याने त्यांची चाल वाया गेली. राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात खाली खेचण्याचे त्यांचे मनसुबे या निमित्ताने धुळीस मिळाले. राष्ट्रवादीने कोल्हापूर जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व ठेवले असून, यापुढेही वर्षानुवर्षे ते तसेच राहील.

प्रश्न : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी राष्ट्रवादीला ही सत्ता टिकविताना सर्वाधिक परिश्रम घ्यावे लागतात. अनेक प्रश्नांना राष्ट्रवादीलाच उत्तर द्यावे लागते. विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादीला टार्गेट केले जाते, याविषयी आपले मत काय?

उत्तर : महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणण्यात आदरणीय शरद पवारसाहेबांचे योगदान फार मोठे आहे. केंद्रीय राजकारणातही भाजपकडून विविध राज्यांतील त्या ठिकाणच्या प्रमुख पक्षांना टार्गेट करण्यात आले होते. महाराष्ट्रात शरद पवारसाहेब भाजपशी गेली अनेक वर्षे दोन हात करत आले आहेत. महाराष्ट्रात भाजपचे अधिक संख्याबळ असतानाही पवार साहेबांनी अतिशय चातुर्याने त्यांचा सत्तेचा हाता-तोंडचा घास काढून घेतल्याने भाजपचा जळफळाट होत असून, संधी मिळेल त्यावेळी राष्ट्रवादीवर व पवार साहेबांवर टीका करण्याचे काम विरोधी भाजपकडून होत आहे. सामान्यांशी नाळ जुळलेला राष्ट्रवादी पक्ष असल्याने सत्तेसाठी भाजपने केलेल्या टीकेचा काहीच परिणाम होत नसल्याने त्यांनाही आता कळून चुकले आहे. भाजपने कितीही आकांडतांडव केले, तरी राज्यात महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 

आदरणीय पवारसाहेब यांनी ही महाविकास आघाडी घट्ट बांधून ठेवली असून, राज्यात आलेल्या कोणत्याही संकटात राष्ट्रवादी पक्ष सर्वात पहिला धावून जात असून, 80 वर्षांचे पवारसाहेब सर्वात मोठे योद्धे असल्याने आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या मागोमाग सतत असतात. 

- शब्दांकन : प्रवीण आजगेकर, गडहिंग्लज