Fri, Jul 10, 2020 02:16होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : माधवी गवंडी नव्या महापौर

कोल्हापूर : माधवी गवंडी नव्या महापौर

Published On: Jun 28 2019 5:14PM | Last Updated: Jun 29 2019 1:28AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

महापौरपदासाठी राष्ट्रवादीत शुक्रवारी नाट्यमय घडामोडी झाल्या. अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर व माधवी गवंडी यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच झाली. दुपारपर्यंत लाटकर यांचे नाव आघाडीवर होते. पक्षाच्या नेत्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. परंतु, दुपारी तीननंतर अचानक त्यांचे नाव मागे पडले आणि गवंडी यांचे नाव निश्‍चित झाले. 

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने गवंडी यांचा अर्ज सादर केला. दिवसभर खलबते चालली आणि अचानक गवंडी यांचे नाव समोर आल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. यंदा सभागृहात प्रथमच बिनविरोध निवड झाली.

विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने अर्जच भरला नाही. मंगळवारी (दि. 2 जुलै) होणार्‍या विशेष सभेत गवंडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. गवंडी यांनी नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला आहे. महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी (महिला) आरक्षित आहे. लाटकर व गवंडी महापौरपदासाठी इच्छुक होत्या. राष्ट्रवादीचे आ. हसन मुश्रीफ यांची त्यामुळे पंचाईत झाली होती. गुरुवारी सायंकाळी सर्किट हाऊसमध्ये मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मते जाणून घेतली. त्यावेळी माजी महापौर सरिता मोरे व त्यांचे पती नंदकुमार मोरे यांनी गवंडी यांना उमेदवारी मिळाली तरच पक्षासोबत राहू, असा स्पष्ट इशारा दिला होता. त्यावरून मुश्रीफ व गवंडी दाम्पत्यात वादावादीही झाली होती. 

गवंडी-पोवार-फरास यांच्यात खडाजंगी

मुश्रीफ यांनी शुक्रवारी सकाळी पुन्हा सर्व नगरसेवकांना सर्किट हाऊसला बोलावले. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी कुणाला मत मांडायचे असल्यास मांडू शकता, असे सांगितले. सर्वच नगरसेवकांनी मुश्रीफ जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे स्पष्ट केले. पोवार यांनी माधवी गवंडी यांना व्हिप बजावणार असून पती प्रकाश आल्यावर सही करा, असे सांगितले. प्रकाश गवंडी आले आणि त्यांनी नंतर सही करतो, असे स्पष्ट केले. त्यावर पोवार यांनी तुमच्या मागेच फिरत राहू काय? मला गरज आहे का? असे सुनावले. त्यावरून पोवार व गवंडी यांच्यात मोठा वाद झाला. माजी नगरसेवक आदिल फरास यांनी हस्तक्षेप करत पोवार यांना माझ्याकडे फॉर्म द्या, मी त्यांची सही घेतो, असे सांगितले. त्यावर पोवार पुन्हा भडकले. मी शहराध्यक्ष आहे, तुम्ही का सही घेणार? असे सुनावले. पुन्हा त्यांच्यात खडाजंगी झाली. अखेर फरास यांनी मी तुमच्यासाठीच सही घेत आहे, असे स्पष्ट केले. या घटनेनंतर माधवी गवंडी सर्किट हाऊसमधून निघून गेल्या, त्या थेट उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच महापालिकेत आल्या. मात्र, प्रकाश गवंडी हे नगरसेवकांसोबत बैठकीत थांबले होते. 

एकसंघ राहण्याची नेत्यांची सूचना

काँग्रेसचे आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आ. मुश्रीफ यांनी ताराबाई पार्कमधील सर विश्‍वेश्‍वरय्या हॉलमध्ये नगरसेवकांची बैठक घेतली. एकसंघ राहून पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी बैठकीत केले. त्यानंतर सर्व नगरसेवकांना महापालिकेत जाण्याच्या सूचना केल्या. मुश्रीफ यांनी, महापौरपदासाठीचे नाव बंद पाकिटातून महापालिकेत पाठवू, ज्याचे नाव असेल त्यांनी उमेदवारी अर्ज भरावा, अशी सूचना पोवार व नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांना केली. त्यानुसार सर्व नगरसेवक महापालिकेत आले.  

अन् बंद पाकिटातून गवंडी यांचे नाव

दुपारी सव्वाचारच्या सुमारास पोवार, प्रा. पाटील महापालिकेत आले. राष्ट्रवादी गटनेता कार्यालयात बसले. साडेचार वाजता पोवार यांनी बंद पाकीट काढले. त्यापूर्वी त्यांनी मुश्रीफ यांचे पत्र वाचून दाखविले. बंद पाकिटात नाव असेल, त्यांचा उमेदवारी अर्ज भरावा व सर्व नगरसेवकांनी त्यांच्या पाठीशी रहावे, असे पत्रात म्हटले होते. त्यानंतर पोवार यांनी बंद पाकीट प्रा. पाटील यांच्याकडे वाचून दाखवण्यासाठी दिले. पाटील यांनी त्यास नकार देत पोवार यांनाच बंद पाकीट फोडून नाव जाहीर करण्यास सांगितले. पाकिटात माधवी गवंडी यांचे नाव असल्याचे जाहीर केले. अखेर गवंडी यांचा अर्ज दाखल करण्यात आला. राजू लाटकर यांनी गवंडी दाम्पत्याचे अभिनंदन केले. 

ताराराणी आघाडीचा फॉर्म तयार; पण भरला नाही...

भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीनेही महापौरपदाची निवडणूक लढविली जाणार होती. त्यासाठी स्मिता माने यांचा उमेदवारी अर्ज भरून तयार होता. सर्व नगरसेवक त्यांचा अर्ज भरण्यासाठी स्थायी समिती सभागृहात थांबले होते. परंतु, काँग्रेसकडून गवंडी यांचा उमेदवारी अर्ज आल्याने भाजप-ताराराणी आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. परिणामी, गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यावर भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी गवंडी यांचे अभिनंदन करून पक्षाचा जयघोष केला. 

नंदकुमार मोरे यांच्याकडून दिलगिरी

माजी महापौर सरिता मोरे यांचे पती नंदकुमार मोरे यांनी गुरुवारी सायंकाळी आ. मुश्रीफ यांच्याशी वादावादी केली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांची नाराजी दूर करण्यात आली. आदिल फरास यांनी दुपारी त्यांना सर्किट हाऊसमध्ये आणले. त्यावेळी मोरे यांनी मुश्रीफ यांची माफी मागून दिलगिरी व्यक्त केली. गैरसमजातून कालचा प्रकार झाला. मुश्रीफ यांच्यामुळेच महापौरपदाची संधी मिळाली. यापुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे मोरे यांनी पत्रकारांना सांगितले. 

गवंडी यांना नको होती उमेदवारी... 

मुश्रीफ यांनी गुरुवारी नगरसेवकांची मते आजमावल्यानंतर माधवी गवंडी यांनी इच्छुक असल्याचे सांगितले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी गवंडी दाम्पत्य कागलमध्ये जाऊन मुश्रीफ यांना आम्हाला आता महापौरपद नको, पुढे द्या, अशी विनंती करून आले होते. तरीही मुश्रीफ यांनी गवंडी यांनाच महापौरपदासाठी पसंती देत उमेदवारी दिली.

वाचा : महापौरपदावरून वादंग