Tue, Jan 19, 2021 23:28होमपेज › Kolhapur › राधानगरी-भुदरगडमध्ये उमेदवारीसाठी देव पाण्यात

राधानगरी-भुदरगडमध्ये उमेदवारीसाठी देव पाण्यात

Published On: Sep 17 2019 1:51AM | Last Updated: Sep 16 2019 9:09PM
राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदार संघात अर्धा डझनहून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. युती आणि आघाडीवर इच्छुकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. उमेदवारी नाकारलेले बंडखोरीचा पवित्रा घेणार असल्याने बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हा घरचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांचे या मतदार संघाकडे विशेष लक्ष राहणार आहे. राधानगरी मतदार संघाचा विस्तार मोठा असल्यामुळे इच्छुकांनी वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या आहेत. मुंबई-पुणे, इचलकरंजी या ठिकाणी  कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन बाहेरील मतदारांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.

आ. प्रकाश आबिटकर यांची  शिवसेनेकडून उमेदवारी निश्‍चित मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  माजी आमदार के. पी. पाटील व त्यांचे मेहुणे तसेच जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपमधून राहुल देसाई इच्छुक आहेत. काँग्रेसमधून सत्यजित जाधव, अरुण डोंगळे इच्छुक आहेत. जीवन पाटील यांनी उमेदवारीसाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. 

भाजप-शिवसेना युती झालीच, तर  राहुल देसाई यांची कोंडी होणार आहे. युती झाली नाहीच, तर भाजपकडून उमेदवारीसाठी आणखी काही नावांची चर्चा सुरू आहे. अन्य पक्षातील काही प्रमुख इच्छुक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ गेल्यास काँग्रेसमधील इच्छुकांची कोंडी होणार आहे.

विधानसभा  निवडणुकीत प्रकाश आबिटकर यांना 1 लाख 32 हजार 485 मते मिळाली, तर के. पी. पाटील यांना 93 हजार 77 मते मिळाली. तब्बल 39 हजार 408 मतांनी प्रकाश आबिटकर यांनी विजय मिळविला.  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राधानगरी मतदार संघाचा खा. संजय मंडलिक यांच्या विजयात मोलाचा वाटा असून, संजय मंडलिक  यांना 1 लाख 25 हजार 953 मते मिळाली, तर धनंजय महाडिक यांना 86 हजार 815 मते मिळाली. संजय मंडलिक यांना तब्बल 39 हजार 138 मते अधिक मिळाली.