Thu, Oct 17, 2019 23:51



होमपेज › Kolhapur › संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाकडून पूर नुकसानीची पाहणी

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाकडून पूर नुकसानीची पाहणी

Published On: Sep 18 2019 1:50AM | Last Updated: Sep 18 2019 1:50AM




कोल्हापूर: प्रतिनिधी
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्ण वत्स यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माणतज्ज्ञ पी. के.दास, उपजीविकातज्ज्ञ हेमंत वाळवेकर आणि अविनाश कुमार यांचा या पथकात समावेश आहे. बुधवारीही या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातआलेल्या महापुराने प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाने मंगळवारी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली. 30 जुलै ते 10 ऑगस्ट या 10 दिवसांच्या कालावधीत सर्वाधिक पाऊस जिल्ह्यामध्ये झाला. मुक्त पाणलोट क्षेत्रामधूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होता. या 10 दिवसांमध्ये सरासरी 90.54  मि.मी. इतका पाऊस झाला. जिल्ह्यातील 345 गावे या महापुरात बाधित झाली. यामध्ये 9542 पूर्णत: घरांचे, तर 31492, अंशत: घरांचे नुकसान झाले आहे. 4221 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे 78102 हेक्टर पिकांचे, तसेच 337 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 282 रस्त्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

कृष्णा, भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून पुराचे जादा वाहून जाणारे 115 टी.एम.सी. पाणी दुष्काळग्रस्त तालुक्यांना पोहोचविण्याचे नियोजित आहे. भविष्यामध्ये असा महापूर आल्यास त्यासाठी उपाय योजना म्हणून रस्त्यांची उंची वाढविणे, आवश्यक त्याठिकाणी उड्डाण पूल बांधणे, आवश्यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती करणे, महावितरणचे उप केंद्र उंच ठिकाणावर बसविणे, विजेच्या खांबांची उंची वाढविणे असे नियोजित आहे. 

सादरीकरणानंतर समितीच्या सदस्यांनी उपाय योजनांबाबत चर्चा केली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.