Wed, Sep 23, 2020 08:05होमपेज › Kolhapur › मॅप चुकला अन् ‘एनआरआय’ बंधार्‍यावर अडकला

मॅप चुकला अन् ‘एनआरआय’ बंधार्‍यावर अडकला

Last Updated: Aug 12 2020 1:20AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

त्याला जायचे होते गोव्याला, तसा त्याने मॅपही लावला. त्या मॅपवरून तो पुढे पुढे जात होता खरा मात्र, तो मंगळवारी पहाटे थेट भुदरगड तालुक्यातील करंबळी गावातील बंधार्‍यावर पोहोचला. पाणी ओसरल्याने बंधार्‍यावर आलेल्या गाळात त्याची चारचाकी अडकली; पण त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण पुढे बंधारा खचला होता. ही माहिती मिळताच सुमारे बारा तासांनी त्याची सुटका करण्यात आली. मात्र, त्याला बाहेर काढल्यानंतर तेथून तो  पळून गेला. त्याचा दिवसभर पोलिस शोध घेत आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सकाळी दूरध्वनीवरून याची माहिती मिळाली. त्यानुसार भुदरगड तहसीलदारांना याबाबत माहिती देण्यात आली. मंडळ अधिकारी राजेश टोळे यांनी स्थानिक महसूल कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्या चारचाकीतून अनिवासी भारतीय  तरुणाची सुटका केली. मात्र, भाषेच्या अडचणीमुळे त्याच्याशी नीट संवाद झाला नाही. दरम्यान, बाहेर काढलेली चारचाकी त्याने पुन्हा बंधार्‍याशेजारी नदीपात्राजवळ लावून तेथून धूम ठोकली.

या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर या अनिवासी भारतीयाचा परिसरात शोध सुरू करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. त्याचा मोबाईल क्रमांक सध्या बंद आहे. मात्र, त्याचे लोकेशन त्याच परिसरात दाखवले जात आहे. यामुळे पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव— केली आहे.

अनर्थ टळला

कोल्हापूर-गारगोटी-शिवडाव असा नवा मार्ग गोव्यासाठी प्रस्तावित आहे. मात्र, त्याचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. तरीही तो नकाशात दाखवला जातो. कदाचित यामुळेच हा तरुण या मार्गे आला असावा. कडगावपासून पुढे तो करंबळीच्या रस्त्याने पुढे गेला असावा. करंबळी-म्हासरंग पैकी अनपवाडी या मार्गावर वेदगंगा नदीवर बंधारा आहे. त्यावरून तो पुढे जात असताना बंधार्‍यावरील गाळात त्याची गाडी अडकली अन् मोठा अनर्थ टळला. हा बंधारा पुढे वाहून गेला आहे. तो तसाच पुढे गेला असता तर तो चारचाकीसह वेदगंगेच्या पाण्यात कोसळला असता; पण गाडी अडकल्याने तो बचावला.
चारचाकी सोडून पसार झाल्याने गूढ वाढले हा अनिवासी भारतीय आपण अमेरिकन सिटिझन असल्याचे सांगत होता. आपल्याकडील ड्रायव्हिंग लायसेन्स दाखवताना पत्त्यावर मात्र बोट ठेवत होता. इंग्रजीसह तो तोडक्या-मोडक्या हिंदी भाषेत बोलत होता. त्यामुळे त्याची अधिक माहिती मिळाली नाही. तसेच  त्याची सुटका केल्यानंतर तो पळून गेला. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

संबधित तरूणांची सुटका केल्यानंतर तो चारचाकी सोडून निघून गेला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचा मोबाईल बंद आहे. मोबाईल लोकेशन त्याच परिसरातच दाखवत असल्याने शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. 
-प्रसाद संकपाळ,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

 "