Wed, Aug 12, 2020 21:13होमपेज › Kolhapur › वाद मिटवू, एकत्र काम करू या...

वाद मिटवू, एकत्र काम करू या...

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 31 2018 12:19AMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

तीन वर्षांनंतर प्रथमच होणार्‍या सर्वसाधारण सभेत कोणत्याही स्थितीत गालबोट लागू नये, यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने काही ठराविक सभासदांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये आपापसांतील गैरसमज मिटवण्यासाठी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत. 

अखिल भारतीय चित्रपट महामंडळात सत्तांतर झाल्यानंतर अध्यक्ष म्हणून मेघराज भोसले यांनी सूत्रे घेतली. अध्यक्ष होण्यापूर्वी भोसले यांनी महामंडळातील गैरकारभाराच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन केले होते. त्यांचा त्यांना फायदा होऊन त्यांच्या पॅनलने बहुमत मिळवले. महामंडळाची सत्ता ताब्यात मिळाल्यानंतर त्यांनी गेल्या पाच वर्षांतील आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करून घेतले. यामध्ये दोषी आजी-माजी संचालकांवर 10 लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला. ही रक्‍कम महामंडळात भरण्याबाबत आदेशही झाले. यामुळे काही माजी संचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला. आम्ही वैयक्‍तिक कोणत्याही पैशाची अफरातफर केली नाही. खर्चाचा तपशील देऊ शकलो नाही, असे सांगितले. 

पैसे न भरलेल्या आजी-माजी संचालकांचे काय करायचे, याबाबत सर्वसाधारण सभेत निर्णय होईल, असे अध्यक्षांनी सांगितले आहे.  त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभा ही वादळी होणार यात शंका नाही. पण, हे वादळ अगोदरच थोपवण्यासाठी व सभासदांमधील गैरसमज दूर करण्यासाठी महामंडळाच्या वतीने नाराज सभासदांबरोबरच चर्चा करण्यासाठी एक पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी असे प्रकार होत नव्हते; पण आता महामंडळाच्या हितासाठी सर्व सभासदांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सभासदांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असल्यास ते दूर करण्यासाठी व मनात कोणतेही हेवेदावे न ठेवता समोपचार घडवण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात बैठक होत आहे.  

याबैठकीला किती सभासद उपस्थित राहतील, हा वेगळा विषय आहे. सर्वसाधारण सभेतील वादळ याच बैठकीत शमवण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न चांगला आहे. या बैठकीत संचालक मंडळाचा हेतू साध्य झाला, तर सर्वसाधारण सभेत कोणतेही विघ्न निर्माण होणार नाही. पण, सर्वसाधारण सभेच्या आगोदर अशा बैठका घेण्यापूर्वी आगोदरच अशा बैठका घेणे गरजेचे होते, असा सूर काही सभासदांनी आळवला आहे. पण, तूर्तास बैठकीनंतरच  सभासदांमधील मतभेद कमी झाले की वाढले, हे स्पष्ट हेाणार आहे.