Fri, Jul 03, 2020 16:48होमपेज › Kolhapur › महापौर गवंडी, उपमहापौर शेटे यांचा राजीनामा

महापौर गवंडी, उपमहापौर शेटे यांचा राजीनामा

Last Updated: Nov 09 2019 1:21AM
कोल्हापूर ः प्रतिनिधी

महापौर माधवी गवंडी व उपमहापौर भूपाल शेटे यांनी शुक्रवारी महासभेत पदांचा राजीनामा दिला. उपमहापौर शेटे यांनी महापौर गवंडी यांच्याकडे तर गवंडी यांनी आपला राजीनामा सभागृहाला सादर केला. सर्वानुमते दोघांचेही राजीनामे मंजूर करण्यात आले. दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर व काँग्रेसकडून अशोक जाधव यांचे उपमहापौरपदासाठी नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

गवंडी व शेटे यांच्या राजीनाम्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने दोन्ही पदे रिक्त झाल्याचा अहवाल पुणे विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला. पुणे विभागीय आयुक्तांकडून नूतन महापौर-उपमहापौर निवडीची तारीख, वेळ व पीठासीन अधिकार्‍यांचे नाव कळविण्यात येईल. त्यावेळी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुका होतील. साधारण 18 किंवा 19 नोव्हेंबरला या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तेतील फॉर्म्युल्यानुसार यंदाच्या पंचवार्षिक सभागृहातील शेवटच्या वर्षाचे महापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. महापौरपदावर खुल्या (महिला) प्रवर्गासाठी आरक्षण आहे. साहजिकच अनेक नगरसेविका इच्छुक होत्या. गेल्यावेळी गवंडी व अ‍ॅड. लाटकर यांच्यात महापौरपदासाठी प्रचंड रस्सीखेच झाली. लाटकर यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची भूमिका माजी महापौर सरिता मोरे यांचे पती नंदकुमार मोरे यांच्यासह काही नगरसेवकांनी घेतली होती.

राष्ट्रवादीचे आ. हसन मुश्रीफ यांनी गवंडी यांना दोन महिन्यांसाठी महापौरपदाची संधी दिली होती. परंतु त्यांच्या पदाची मुदत संपेपर्यंत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. परिणामी गवंडी यांना पुन्हा मुदतवाढ मिळाली. 2 जुलैला महापौरपदावर विराजमान झालेल्या गवंडी यांनी अखेर शुक्रवारी राजीनामा दिला. तर शेटे यांनी अकरा महिन्यांनंतर पदाचा राजीनामा दिला. 

राष्ट्रवादीला जादा मुदतीची शक्यता...
राष्ट्रवादीकडे अवघा दीड महिन्याच्या कालावधीसाठी महापौरपद आहे. एवढा कमी कालावधी महापौरपदासाठी मिळाल्यास पदांच्या खांडोळीवरून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला रोषाला सामोरे जावे लागेल. परिणामी काँग्रेसकडून महापौरपदासाठी दोन-तीन महिन्यांच्या कालावधीचा बोनस मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.