Sun, Sep 27, 2020 01:43होमपेज › Kolhapur › महावितरणचा ऊस पिकाला ‘शॉक’

महावितरणचा ऊस पिकाला ‘शॉक’

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 12:33AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : एकनाथ नाईक 

जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे ऊस पीक जळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च 2017 ते डिसेंबर 2017 (आजअखेर) 59 शेतकर्‍यांच्या ऊस पिकाला महावितरणचा ‘शॉक’ लागला आहे.त्यामुळे जळीतग्रस्त ऊस पिकापोटी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 18  शेतकर्‍यांना महावितरण कंपनीकडून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. जळिताचा अहवाल महावितरणाला मिळाल्यानंतर उर्वरित शेतकर्‍यांनाही आथिर्र्क मदत दिली जाते. काही शेतकर्‍यांची प्रकरणे न्याय प्रविष्ठ आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रात युद्धपातळीवर ऊस तोडणी सुरू आहे. त्यातच महावितरणाच्या विद्युत प्रवाह करणार्‍या तारांचे जंजाळ गल्लीपासून शिवारापर्यंत आहे. अनेक ठिकाणी जुने विद्युत खांब गंजून सडले आहेत. कधी शिवारात कोसळतील हे सांगता येत नाही. तर काही खांब हे झुकलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे विद्युत प्रवाह करणार्‍या तारांचा स्पर्श ऊस पिकाला होत आहे. त्यातच वातावरणातील बदलामुळे घोंगावणार्‍या वार्‍यामुळे ठिणग्या पडून ऊस पेटण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. पंधरा ते सोळा महिने राबराब राबून पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेला ऊस बघता बघता जळून खाक होताना बघून शेतकर्‍यांच्या डोळ्याच्या कडा ओलावू लागल्या आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात  शॉर्ट सर्किटमुळे सन 2016-मार्च 2017 अखेर 40 तर मार्च 2017 ते आज अखेर 59 शेतकर्‍यांचा ऊस होरपळून निघाला आहे. होरपळलेल्या ऊस साखर कारखाने त्वरित तोडणी देऊन उसाचे गाळप करतात. ऊस जळाल्याने साखर उतार्‍यांत मोठी घट होऊन उसाचे वजन घटते. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसतो. ऊस जळाल्यानंतर तलाठी, सर्कल आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फत जळीत क्षेत्राची पाहणी करून अहवाल करतात. मागील उसाचे उत्पादन व जळलेल्या उसाचे निरीक्षण करून आर्थिक ताळमेळ घालून शेतकर्‍यांना आर्थिक मदत दिली जाते. साखर कारखान्याकडे गाळपास गेलेल्या जळीत उसाचा उतारा आणि मागील उसाचे टनेज आदींचा विचार करून शेतकर्‍यांना महावितरण कंपनी आर्थिक मदत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करते.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी शिवारात विद्युत प्रवाह करणार्‍या तारांपासून सावध राहावे. ज्या ठिकाणी विद्युत प्रवाह करणारे पोल सडले आहेत किंवा तारा झुकलेल्या आहेत, त्यासंबंधीची तक्रार शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीस टोल फ्री क्रमांकाद्वारे ऑनलाईन किंवा लेखी स्वरूपात द्यावी.

शेतकर्‍यांनी काय काळजी घ्यावी

सडलेल्या विद्युत पोलसंबंधी महावितरण अधिकार्‍यांना लेखी कळवावे  
लोंबकळणार्‍या तारांच्या जवळ जाऊ नये  
विद्युत तारांच्या स्पार्कमुळे ठिणग्या पडत असतील तर महावितरणला कळवावे  
लोंबकळणार्‍या तारांना टेकू देऊ नये किंवा शेतकर्‍यांनी अघोरी शक्‍कल लढवू नये  
शेतमजुरांनी ऊस तोडताना विद्युत प्रवाह खंडित करण्याबाबत महावितरणला कळवावे 
उसाचे पाचट जाळताना काळजी घ्यावी  
टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.