Thu, Sep 24, 2020 06:38होमपेज › Kolhapur › ‘एमजेओ’ सक्रिय; राज्यात दमदार पावसाची चिन्हे

‘एमजेओ’ सक्रिय; राज्यात दमदार पावसाची चिन्हे

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 21 2018 1:23AMकोल्हापूर : विजय पाटील

मेअखेरीस मान्सून केरळात दाखल झाला, तरीही पाऊस मात्र अजून रूसून बसला आहे. याचे कारण मॅडेन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) सक्रिय झालेले नाही. मान्सूनच्या वेगावर ‘एमजेओ’ परिणाम करते; पण आता ‘एमजेओ’चा प्रवाह पुन्हा सुरू होणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत पाऊस धो-धो बरसणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे.

यंदा मे महिन्याच्या उष्म्याच्या वातावरणातच पाऊस चांगला पडणार असल्याचे अंदाज धडकत होते. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वच वर्ग आनंदाचे गाणे गात आहे. अंदाजाप्रमाणे यंदा मान्सून लवकर केरळात दाखल झाला. आता येणार, बरसणार असे म्हणत असताना 9 जूनपासून मान्सूनचा वेग मंदावला आहे. पाणी शिंपडल्यासारखा पाऊस पडून गायब होऊ लागला आहे. त्यामुळे पाऊस पडणार की नाही, असे चित्र दिसू लागले आहे; पण आता मान्सूनला गती देणारा ‘एमजेओ’ अनुकूल बनण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे मान्सून वेगाने सक्रिय होऊ शकतो. यासाठी दोन ते चार दिवसांची कदाचित वाट पहावी लागेल, असे हवामानशास्त्र विभागाला वाटते. ही गोड बातमी खरी होईल, असे दिसत असल्याने बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट टळू शकते.

मान्सूनचा जिगरी दोस्त ‘एमजेओ’ कोण?

मान्सूनला वेग देणारा आणि पुढे वाहण्यास प्रवृत्त करणारा हा वातावरणीय बदलाचा एक भाग आहे. ‘एमजेओ’ ही नैऋत्य मान्सूनच्या  हालचालीवर परिणाम करणारी एक नित्य घटना मानली जाते. ही एक सागरी हवामानविषयक घटना आहे. याचा परिणाम नुसत्या मान्सूनवर नव्हे, तर जागतिक हवामानावर होतो.  विषवृत्तानजीकचे ढग, पर्जन्य, वारे, आणि दाब यांचे पूर्व दिशेला वाहन करणारे साधन म्हणजे ‘एमजेओ’ असे म्हणता येईल. जूनच्या काळात ‘एमजेओ’ हिंदी महासागरावर सक्रिय असेल, तर भारतात निर्धारित वेळेत आणि संततधार पाऊस पडतो. ‘एमजेओ’चे एक महिना ते दोन महिन्यांच्या कालावधीचे चक्र असते.  तीस ते साठ दिवसांचे एमजेओचे एक चक्र असते. ‘अल निनो’ जसे मान्सूनवर थेट परिणाम करून पाऊस कसा, किती आणि केव्हा, हे निश्‍चित ठरवू शकते, तशाच पद्धतीच्या वातावरणीय बदलाला ‘एमजेओ’ दिशा देऊ शकते. ‘एमजेओ’ मान्सूनच्या काळात अनुकूल असणे पावसासाठी जिगरी दोस्ताच्या मदतीसारखी घटना आहे.