Sat, Feb 29, 2020 00:14होमपेज › Kolhapur › बेरोजगारीमुळे एमबीए विद्यार्थ्याची आत्महत्या

बेरोजगारीमुळे एमबीए विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: Sep 30 2019 1:49AM | Last Updated: Sep 30 2019 1:49AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

एमबीएची पदवी मिळवली. नोकरीसाठी कितीतरी उंबरे झिजवले. पदरी निराशाच पडली. सततच्या नकारांनी नैराश्याने अखेर टोक गाठले आणि शिवाजी पेठेतील तारकेश संतोष पाटील (वय 22, रा. आयरेकर गल्ली) या तरुणाने अखेर स्वत:ला संपवून टाकले. आपल्या अभ्यासाच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेऊन गळफास घेतला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. राजवाडा पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली.

तारकेश एमबीए उत्तीर्ण झाला होता. एमबीएनंतर कुटुंबाला हातभार लावू म्हणून तो सातत्याने नोकरीच्या शोधात होता. पण त्याला यश मिळत नव्हते. वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्याने एम.कॉम.ला अ‍ॅडमिशनही घेतलेली होती. शनिवारी रात्री आपल्या अभ्यासाच्या खोलीतच तो झोपला होता. रविवारी सकाळी आठपर्यंतही तो खोलीबाहेर न आल्याने घरच्यांनी दार ठोठावले. पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर     त्याच्या चुलत्याने दरवाजा तोडला. समोर थरकाप उडवणारे द‍ृश्य होते. तारकेशने स्लॅबच्या हुकाला टॉवेल लावून गळफास घेतलेला होता. त्याला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये आणले; मात्र उपयोग झाला नाही. तारकेश लाडाकोडात वाढलेला होता. त्याचे वडील विवेकानंद कॉलेजला लिपिक आहेत. आई गृहिणी आहे. त्याचा भाऊ शिक्षणानिमित्त परगावी असतो.

मोबाईल रिसेट...

तारकेश सतत मोबाईलमध्ये गुरफटलेला असे, ही माहिती मिळाल्यावरून रविवारी त्याचा मोबाईल तपासण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, त्याने मोबाईल रिसेट मारलेला होता.