Tue, Jun 15, 2021 13:19होमपेज › Kolhapur › आधी रस्त्याचं आणि पार्किंगचं तेवढं बघा!

आधी रस्त्याचं आणि पार्किंगचं तेवढं बघा!

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 10:59PMकोल्हापूर : विजय पाटील 

तोरस्कर चौक परिसरातील रस्ता खणून ठेवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महावीर कॉलेजकडे जाण्यासाठीचा मार्गही अडवला आहे. शहरातील ठिकठिकाणी असे वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. दुसर्‍या बाजूला वाहनांचे पार्किंग कुठे करायचे हा प्रश्‍न शहरवासीयांसमोर आक्राळ-विक्राळ रूप घेऊन उभा आहे. काहीही करा, पण या रस्त्यांचे व पार्किंगचे तेवढं मिटवा, असं नागरिक थेट बोलू लागले आहेत. 

वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची गरज आहे. यामध्ये रस्त्यावर अडथळे  निर्माण होणार नाहीत, अशी पार्किंगची ठिकाणे असावीत. तसेच वर्दळीचे रस्ते अपवाद सोडले तर बंद ठेवू नयेत. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत; पण आपल्याकडे विचारतोय कोण आणि ऐकतोय कोण? अशी विचित्र स्थिती दिसते. कारण सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या रस्त्यावर तीन महिने काम सुरू होते. यापूर्वी रंकाळ्याकडून सानेगुरुजीकडे जाणारा रस्ता अनेक वर्षे बंदच होता. रस्त्यांची कामे शक्यतो रात्री करावीत, असा स्पष्ट आदेश आहे; पण हा आदेश कोण पाळण्याच्या फंदात पडत नाही. खानविलकर पेट्रोल पंपानजीकच्या खणलेल्या रस्त्यांवर सिमेंटचे मोठे नळे टाकले होते. या नळ्यांना धडकून दोन सख्ख्या भावांना मृत्यू झाला होता. हे अपघात कसे म्हणता येतील. कारण कंत्राटदारांनी कामे वेळेत केलीच पाहिजेत. 

दुसर्‍या बाजूला महापालिकेचे जबाबदार अधिकारी आणि वाहतुकीचे नियमन करणारी शहर वाहतूक नियंत्रण शाखा झोपेत काम करते की काय, असे लोकांना वाटत राहते. ज्यांची जबाबदारी आहे त्या सगळ्याच यंत्रणांनी प्रामाणिकपणे काम केले तर कसलीच समस्या निर्माण होणार नाही.  रस्त्यांची कामे युद्धपातळीवर केली तरच ती लवकर पूर्ण होतील आणि नागरिकांनाही त्रास होणार नाही, पण शहरात याच्या नेमकं उलटं चित्र अनेक वर्षांपासून दिसत आहे.