Sat, Jul 04, 2020 00:19होमपेज › Kolhapur › लोकसभा निवडणूक : मतमोजणी लांबणार 

लोकसभा निवडणूक : मतमोजणी लांबणार 

Published On: May 06 2019 1:49AM | Last Updated: May 06 2019 1:49AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. 23 मे रोजी होणार आहे. या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यावेळी मतमोजणी लांबणार आहे. यामुळे अंतिम निकाल सायंकाळनंतरच हाती येण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर मतदारसंघासाठी 70.70 टक्के, तर हातकणंगले मतदारसंघासाठी 70.28 टक्के मतदान झाले. कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदाम येथे, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील शासकीय गोदामात होणार आहे. या दोन्ही ठिकाणी जागा कमी असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबलवरच मतमोजणी करता येणार आहे. यामुळे मतमोजणीच्या फेर्‍या वाढणार आहेत. राधानगरी मतदारसंघासाठी सर्वाधिक 31, तर इचलकरंजी मतदारसंघासाठी सर्वात कमी 20 फेर्‍या होणार आहेत.

एका फेरीसाठी किमान दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट यंत्रांतील चिठ्ठ्याही मोजल्या जाणार आहेत. एका व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. यामुळे संपूर्ण फेर्‍यांची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी किमान सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे. यासह सैनिक मतदारांनी केेलेल्या मतपत्रिका तीनवेळा स्कॅनिंग केल्या जाणार आहेत. प्रथम पहिल्या लिफाफ्यावरील बारकोड स्कॅनिंग होईल. त्यानंतर त्या लिफाफ्यात असलेल्या दुसर्‍या लिफाफ्यावरील बारकोड स्कॅन करण्यात येणार आहे. यानंतर संबंधित सैनिक मतदाराने पाठवलेल्या मतपत्रिकेवरील बारकोडचेही स्कॅनिंग करण्यात येणार आहे. हे सर्व झाल्यानंतर या मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. 

दरम्यान पोस्टल बॅलेटचीही मोजणी केली जाणार आहे. सैनिकांचे मतदान व टपाली मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र मोजणी टेबल ठेवण्यात येणार असला तरीही या मोजणीलाही वेळ लागण्याचीच शक्यता आहे.

मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर अवघ्या तीन-चार तासात दुपारपर्यंत निकाल हाती येईल अशी शक्यता होती. मात्र, मतमोजणीच्या फेर्‍या, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांचीही होणारी मोजणी, सैनिक मतदारांच्या मतपत्रिकांचे स्कॅनिंग आदींमुळे सांयकाळनंतरच निकाल लागण्याची चिन्हे आहेत. मतमोजणीसाठी दोन्ही मतदार संघासाठी प्रत्येकी 587  अशा एकूण 1174 अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासह अन्य कर्मचारी मिळून सुमारे 1500 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत कार्यरत राहणार आहेत.