Thu, Feb 27, 2020 21:52होमपेज › Kolhapur › भाजप, राष्ट्रवादीत खडाखडी

भाजप, राष्ट्रवादीत खडाखडी

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 25 2018 12:48AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे मैदान जवळ येऊ लागल्याने जिल्ह्यात राजकीय आडाखे बांधले जात असून, त्यात भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून एकमेकांचे अंदाज घेत संभ्रम निर्माण करण्याचे कौशल्यही वापरले जाऊ लागले आहे. जिल्ह्यात विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादीकडूनच खडाखडी सुरू असल्याचे चित्र आहे.आ. हसन मुश्रीफ यांच्यापाठोपाठ माजी आमदार संजय घाटगे यांचा साजरा झालेला वाढदिवस कागल तालुक्यासह जिल्हाभर गाजला. कागल विधानसभा मतदारसंघातील या दोन्ही बलाढ्य नेत्यांचे वाढदिवस म्हणजे आगामी निवडणुकीची रंगीत तालीमच मानली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौराही चर्चेत आला आहे.

जिल्ह्यात कागल विधानसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असेच चित्र निर्माण झाले आहे. मुश्रीफ यांचा वाढदिवस राष्ट्रवादीने तर घाटगे यांचा भाजपने प्रायोजित केल्याचेही दर्शन यानिमित्ताने झाले. 25 मार्चला मुश्रीफ यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त संपूर्ण कागल तालुका सजला होताच. शिवाय, जिल्हाभर होर्डिंग उभारले गेले होते. तोच काहीसा अनुभव घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कालगकरांना आला. दोघांनीही शक्‍तिप्रदर्शन केले. मुश्रीफ यांनी जिल्हास्तरावरील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत वाढदिवस साजरा केला. तर घाटगे यांच्या वाढदिवसाला राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले. 

ना. पाटील यांच्यासह राज्यसभेचे खा. संभाजीराजे यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. ना. पाटील यांनी घाटगेंना विधानसभेसाठी थेट पाठिंबा व्यक्‍त केला. शत्रू ठरला असल्याचे सांगून तुमच्याबरोबर आम्ही आहोत. कामाला लागा, असा सल्लाही दिला. तर दुसरीकडे संभाजीराजे यांनी कागलमध्ये केवळ सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे हे दोनच लोकनेते होऊन गेले. इतरांनी ती स्वप्ने पाहू नयेत, असा टोला लगावला. ना. पाटील यांनी ठरविलेला शत्रू आणि संभाजीराजे यांनी दोघांशिवाय तिसरा लोकनेता नाही, असा लगावलेला टोला हा आ. मुश्रीफ  यांनाच होता, असा अर्थ कागलकरांनी लावला आहेच. संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. शिवाय, मुश्रीफ यांनी त्यांचा प्रचारही केला होता; पण पराभवानंतर त्यांनी मुश्रीफांसह राष्ट्रवादीकडे पाठ फिरविली होती. याचीही आठवण यानिमित्ताने जिल्ह्याला झाली.

एकीकडे कागलच्या स्थानिक नेत्यांतील संघर्ष इरेला पेटत असतानाच वरिष्ठ नेत्यांनीही त्यासाठी फिल्डिंग लावल्याचे स्पष्ट झाले. मुश्रीफ यांच्या वाढदिवसाला शरद पवार आले नसले तरी त्यांचे कट्टर विरोधक घाटगे यांच्या वाढदिवशी मात्र कोल्हापूर दौर्‍यावर आले. नियोजित कार्यक्रमांसाठी ते आल्याचे सांगितले जात असले, तरी घाटगे यांच्या वाढदिवसादिवशीच त्यांचा झालेला दौरा दुर्लक्षित केला जाणार नाही.
राजकीय घडामोडींवरून ना. पाटील यांचा धसका दोन्ही काँग्रेसने घेतला की काय, असा अर्थही लावला जात आहे. देश पातळीवर अत्यंत हुशार आणि राजकीय जिगरबाज नेते म्हणून पवार यांना ओळखले जाते. त्यांनी कोल्हापुरात येऊन थेट ना. पाटील यांच्यावर लक्ष केंद्रित केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. अर्थातच, जिल्ह्यात ना. पाटील यांचे डावपेच रोखण्यासाठी पवार यांना लक्ष घालावे लागल्याचेही बोलले जात आहे.

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी व भाजपचाही उमेदवार निश्‍चित नाही. काही दिवसांपूर्वी विद्यमान खा. धनंजय महाडिक भाजप नेत्यांसोबत दिसत होते. तेच आता पुन्हा स्वगृही परतून राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आहेत. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याची घोषणा करणारे आ. मुश्रीफ आता महाडिक यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले आहेत. यातूनच मतदारांमध्ये कशा प्रकारे संभ्रम निर्माण केला जात आहे, याचा नमुना जिल्ह्याला पाहायला मिळत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात ना. पाटील यांची सत्तेसाठी हातमिळवणी

राज्यात मुख्यमंत्र्यांऐवजी कोल्हापुरातून धोरणात्मक निर्णय जाहीर होतात, असे सांगून पवार यांनी ना. चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढविल्याचे मानले जात असतानाच लोकांमधून निवडून या, असे आव्हान देत मिळाली संधी तोपर्यंत लाभ घ्या, असे तिरकस वक्‍तव्यही पवार यांनी केले. अर्थात, कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातार्‍यात ना. पाटील यांच्या उधळत असलेल्या वारूने पवार यांचे लक्ष वेधल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मूळच्या भाजपची ताकद या तिन्ही जिल्ह्यांत कमी असली, तरी राजकीय मुत्सद्देगिरीतून ना. पाटील यांनी सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यात मोठे यश संपादन केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही बलाढ्य नेत्यांना धक्‍का बसला आहे. काही ठिकाणी तर या पक्षाच्या नेत्यांबरोबरच हातमिळवणी करून ना. पाटील यांनी सत्तेत वाटा मिळविला आहे.

Tags : Kolhapur, Lok Sabha, assembly, election